घाटावर लाकडे नसतानाही दिल्याचे दाखविले
By Admin | Updated: December 8, 2014 00:57 IST2014-12-08T00:57:21+5:302014-12-08T00:57:21+5:30
महापालिकेत दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करण्यात झालेला घोटाळा अंकेक्षण अहवालाने उजेडात आणला आहे. या अहवालात उघडकीस आलेले सत्य लाजिरवाणे तेवढेच संतापजनकही आहे.

घाटावर लाकडे नसतानाही दिल्याचे दाखविले
मनपाची लूट : लाकडाच्या साठ्याची नोंदवहीत नोंदच नाही
नागपूर : महापालिकेत दहनघाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठा करण्यात झालेला घोटाळा अंकेक्षण अहवालाने उजेडात आणला आहे. या अहवालात उघडकीस आलेले सत्य लाजिरवाणे तेवढेच संतापजनकही आहे. दिघोरी घाटावर जळाऊ लाकडाचा साठा उपलब्ध नसतानाही प्रेत जाळण्यासाठी लाकूड दिल्याचे दाखवून त्याचे बिल घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संवेदनशील विषयावर कारवाई करण्यासाठी नागपूर महापालिका कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही, यावर सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अंकेक्षण अहवालात नमूद तपशिलानुसार दिघोही घाटावरील २०११-१२ च्या लाकूड साठा पुस्तकाची पडताळणी केली असता, साठा पुस्तक क्रमांक ६ वर जून २०११ अखेर २७१ किलो लाकूड शिल्लक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. असे असतानाही २ जुलै २०११ ते २७ जुलै २०११ पर्यंत एकूण ११ प्रेतांवर अंत्यविधी करण्यासाठी ३.३०० टन लाकूड देण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.
प्रत्यक्षात घाटावर २८ जुलै २०११ रोजी १५ टन लाकडाचा पुरवठा करण्यात आल्याची नोंद आहे. असे असतानाही २ ते २७ जुलै २०११ दरम्यान घाटावर लाकूड उपलब्ध नसताना ११ प्रेते जाळण्यासाठी लाकूड कुठून दिले, असा आक्षेप अंकेक्षण अहवालात घेण्यात आला आहे.
याशिवाय महेश सेल्स कॉर्पोरेशनने खरेदी केलेला लाकडाचा साठा व नोंदवहीतील नोंदी यात बरीच तफावत आहे. अंकेक्षकांनी केलेल्या पडताळणीत ही बाब समोर आली आहे. (प्रतिनिधी)
एकाच पावतीवर दोन बिले दाखविली
महेश सेल्स कॉर्पोरेशन यांनी एकाच क्रमांकाच्या पावतीवर पुरविलेल्या मालाची नोंद दोन बिलावर दर्शवून २९ हजार ९९१ रुपये उचलले आहेत. पावती क्रमांक ३३१६७ दि. २६ सप्टेंबर २०११ नुसार अंबाझरी घाटावर ११.१४५ टन लाकडाचा वाहन क्रमांक एमपी २२६/१७८९ द्वारे पुरवठा करण्यात आला. परंतु त्याची नोंद बिल क्रमांक ४४९ व ४५० या दोन्ही बिलात दाखवून २९ हजार ९९१ रुपयांची उचल केली आहे. अंकेक्षण अहवालात ही बाब चव्हाट्यावर आली आहे. मयताच्या लाकडात घोटाळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.