- तर बडेगाव परिसरात होईल कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST2021-04-10T04:07:57+5:302021-04-10T04:07:57+5:30
बडेगाव : प्रशासनाकडून वारंवार विनंती करूनही बडेगाव (ता.सावनेर) परिसरातील नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवीत आहेत. कोविड लस सुरक्षित असली ...

- तर बडेगाव परिसरात होईल कोरोनाचा उद्रेक
बडेगाव : प्रशासनाकडून वारंवार विनंती करूनही बडेगाव (ता.सावनेर) परिसरातील नागरिक लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवीत आहेत. कोविड लस सुरक्षित असली तरी काही मंडळी याबाबत गैरसमज निर्माण करीत आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास बडेगाव परिसरात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बडेगाव केंद्रावर आतापर्यंत केवळ २० टक्केच नागरिकांचे लसीकरण झाले. यात वाढ होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र यास नागरिकांचा प्रतिसाद नाही. यासोबतच कोरानाबाधितांच्या मुक्तसंचारामुळे गावोगावी संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी परिसरातील अनेक बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष फिरून लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी समुपदेशन केले. शिक्षक प्रगणक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका रोज घरोघरी जाऊन ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
परिसरातील दुकानदार सूचना देऊनही तपासणी न करताच दुकाने उघडत आहेत. मास्क न वापरताच रस्त्याने व चौकांमध्ये तरुणांचे घोळके आणि रिकामटेकडे वावरताना दिसत आहेत. ग्रामपंचायत किंवा यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांनी हटकल्यास त्यांच्यासोबतच वाद घातला जातो. परिसरात बंगाली डॉक्टर विना परवाना दवाखाने चालवीत असून, लोकांची कोरोना तपासणी न करताच उपचार करताना दिसून येत आहेत. त्यापैकी एका डॉक्टरचे संपूर्ण कुटुंब बाधित असूनही ते लोकांना घरीच गुपचूप उपचार आणि औषधे देत आहेत. यामुळे परिसरात संक्रमण वाढले, अशा अनेक तक्रारींचा पाढाच वाचत आपली हतबलता कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी बडेगाव परिसरात गुरुवारी (दि.८) घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये मांडली. आरोग्य केंद्रावरील असुविधा तात्काळ दूर करण्यासाठी आरोग्य अधिकारी जुनैद अन्सारी यांना याप्रसंगी सूचना करण्यात आल्या. परिसरात कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर नियमित कारवाई करण्याची सूचना ठाणेदार अजय मानकर यांना देण्यात आली.
गुन्हे दाखल करण्याचे आदेश
विलगीकरण नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामपंचायत सचिवांना देण्यात आले. लसीकरण न करणाऱ्या नारिकांना प्रसंगी स्वस्त धान्य पुरवठा, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाची प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ यापासून वंचित ठेवण्याबाबत विचार करावा लागेल, असाही सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य छाया बनसिंगे, पं.स. सदस्या भावना चिखले, सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुका सचिव संघटना अध्यक्ष नरेश मट्टामी, पोलीस पाटील अरविंद नवले आदी उपस्थित होते.