तणावातून तरुणाने आयुष्य संपवले, प्रेयसीसोबत लग्नाचे स्वप्न अधुरेच राहिले; २४ तासांत दोन आत्महत्या
By योगेश पांडे | Updated: June 13, 2023 18:36 IST2023-06-13T18:35:55+5:302023-06-13T18:36:24+5:30
एका मुलीवर प्रेमदेखील होते व दिवाळीनंतर त्याने लग्न करण्याचेदेखील ठरविले होते.

तणावातून तरुणाने आयुष्य संपवले, प्रेयसीसोबत लग्नाचे स्वप्न अधुरेच राहिले; २४ तासांत दोन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २४ तासांत शहरात दोन जणांनी गळफास घेत आत्महत्या केली. पारडी व कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
राहुल दिलीप वडई (३०, एचबी टाऊन, भंडारा रोड) यांनी ११ जून रोजी त्यांच्या घराच्या बेडरूममधील ग्रिलच्या खिडकीला इलेक्ट्रीक वायरने बांधून गळफास घेतला. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात दाखल केले. सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पारडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे दुचाकीचे दुकान होते. मागील काही दिवसांपासून तो तणावात होता. त्याचे एका मुलीवर प्रेमदेखील होते व दिवाळीनंतर त्याने लग्न करण्याचेदेखील ठरविले होते. मात्र त्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दुसरी घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिरामन रामकिशोर शाहू (४५, महादुला) यांनी घरच्या हॉलमध्ये सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतला. मंगळवारी मध्यरात्री ही बाब लक्षात आली. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. कोराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.