विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार
By निशांत वानखेडे | Updated: May 26, 2024 17:47 IST2024-05-26T17:47:11+5:302024-05-26T17:47:27+5:30
नागपूर जिल्ह्यात ६०,६५८ विद्यार्थी, दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची परंपरा आहे.

विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च २०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल साेमवारी जाहीर हाेत आहे. त्यामुळे राज्यातील ९ लाखांसह नागपूर विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. विशेष म्हणजे यंदा आठवडाभरापूर्वी दहावीचा निकाल जाहीर हाेत आहे.
एक मार्च राेजी राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली हाेती. यंदा नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ६८० केंद्रावरून दीड लाखाच्यावर विद्यार्थी परीक्षेला बसले हाेते. नागपूर जिल्ह्यात २२० केंद्रावरून ६०,६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३१,३२९ मुले आणि २९,३२९ मुलींचा समावेश हाेता. काॅपीमुक्त परीक्षेसाठी यंदा बाेर्डाकडून राबविलेले अभियान बऱ्यापैकी यशस्वी ठरले.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची परंपरा आहे. मात्र यंदा अंतर्गत प्रात्याक्षिक व मूल्यामापनाचे गुण ओएमआर शीटऐवजी बाेर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यात आल्याने निकाल आठवडाभर अगाेदर लावण्यात येत असल्याची माहिती विभागीय बाेर्डाकडून देण्यात आली. विद्यार्थी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहू शकतील.