देशात असहकार आंदोलनाची गाडी नागपूर स्थानकावरूनच सुटली होती सुसाट
By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2025 21:35 IST2025-01-15T21:34:37+5:302025-01-15T21:35:06+5:30
खुद्द म. गांधींनी दिली होती स्थानकाला भेट : १०० वर्षांचा

देशात असहकार आंदोलनाची गाडी नागपूर स्थानकावरूनच सुटली होती सुसाट
नागपूर : जुलमी ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलनाच्या वणव्याची ज्वाला देशभर पेटविण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानक परिसराने महत्वाची भूमीका वठविली. खुद्द महात्मा गांधी यांनीच नागपूर रेल्वे स्थानकावर येऊन, येथून पुढे जाताना ज्वाजल्य राष्ट्रभक्तीची ज्योत देशातील विविध भागात नेली होती. आज नागपूर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला १०० वर्षे पूर्ण झाले असून त्या पार्श्वभूमीवर, ही घडामोडही अधोरेखित झाली आहे.
देशाच्या हृदयस्थळी असलेले नागपूर आपल्या राजवटीसाठी अत्यंत महत्वाचे स्थळ असल्याचे ध्यानात आल्याने ब्रिटिशांनी येथे रेल्वे स्थानक निर्मितीला सुरूवात केली. ते तयार झाले आणि नागपूर रेल्वे स्थानकावर पहिली रेल्वेगाडी १८६७ ला पोहचली. नंतर येथून ठिकठिकाणचे मार्ग ईंग्रजांनी प्रशस्त केले. त्यानंतर १९२० ला या स्थानकाला 'नागपूर जंक्शन' असे नाव देण्यात आले. ईकडे १ ऑगस्ट १९२० ला देशात ब्रिटिशांविरुद्ध असहकार आंदोलन सुरू झाले. भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर-विदर्भात त्याचा वणवा पेटला. त्यामुळे म. गांधी नागपुरात आले. त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर काही वेळ वास्तव्य करीत देशभक्तांना दिशानिर्देश दिले अन् येथून ते पुढे मार्गस्थ झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांनी अर्थात १५ जानेवारी १९२५ ला तत्कालीन मध्य प्रांताचे राज्यपाल सर फ्रँक स्लाय यांच्या हस्ते नागपूर रेल्वे स्थानकाच्या शानदार ईमारतीचे उद्घाटन झाले. आज त्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहे.
रोज २८३ गाड्यांचे संचालन
येथून दररोज २८३ गाड्यांचे संचालन-व्यवस्थापन केले जाते. त्यातील ९६ गाड्या येथून सुटतात आणि समाप्त होतात. देशाच्या विविध भागात नागपूरहून थेट १८ गाड्या सोडल्या जातात.
वर्षभरात २ कोटी ३६ लाख प्रवासी
गेल्या वर्षभरात नागपूर स्थानकावरून २ कोटी, ३६ लाख, प्रवाशांचे आवागमन झाले आहे. रोज सरासरी येथून ६८,७२९ प्रवासी येणे-जाणे करतात.
तीन वेगवेगळ्या वंदे भारतचे संचालन
येथून नागपूर बिलासपूर, नागपूर उज्जैन इंदोर आणि नागपूर सिकंदराबाद या तीन वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन केले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नागपूर स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक बणविण्यासाठी ४८८ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले.