विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 21:01 IST2022-04-20T21:00:32+5:302022-04-20T21:01:48+5:30
Nagpur News जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे.

विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेव जणू विदर्भात मुक्कामी असल्याची स्थिती दिसून येत आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर ४५.२ अंश व ४४.९ अंशांसह अकाेला तिसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. जगातील पहिल्या १५ मध्ये अमरावती, वर्ध्यासह पाच शहरे विदर्भाचे आहेत. १५ अतिउष्ण शहरांमध्ये १३ शहरे भारतातीलच आहेत.
विदर्भात सर्वत्र कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. सूर्याच्या अतिनील चटक्यांनी नागरिकांना चांगलेच हाेरपळले असून, अंगाची लाहीलाही हाेत आहे. हवामान विभागाने १८ ते २० एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा इशारा दिला हाेता. बुधवारी नागपूर वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऱ्याने उसळी घेतली. नागपूरमध्ये ४३.२ अंशांची नाेंद करण्यात आली, जी मंगळवारच्या तुलनेत ०.४ अंश कमी आहे. मात्र, उन्हाच्या चटक्यांनी पारा ४५ अंश पार गेल्याची जाणीव नागरिकांना हाेत हाेती. ४२ अंशांसह केवळ गडचिराेली वगळता, इतर जिल्हे उच्चांकावर पाेहोचले आहेत. अमरावती व वर्धा ४४.२ अंश, गाेंदिया ४४ अंश आणि वाशिम ४३.५ अंशांवर पाेहोचले.
काही तज्ज्ञांच्या मते सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, २१ व २२ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह काेरडे वादळ येण्याची शक्यता आहे. मात्र, दाेन दिवस वातावरण बदलण्याची शक्यता नाही. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारी शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.