सुनील चरपेनागपूर : पृथ्वीच्या हवामानाचा तोल बिघडू लागला की, आकाशातील प्रत्येक ढंग, वाऱ्याची प्रत्येक झुळूक, पावसाचा प्रत्येक थेंब नवे समीकरण मांडू लागतो. ढगफुटी, गारपिट, पुराचा महाप्रकोप, तर कधी चक्रीवादळ हे सर्व बदल जगण्या-मरण्याचा प्रश्न बनले आहेत. याचा सर्वाधिक आघात शेतीला बसतो. अन्नसुरक्षेचा पाया हादरवणाऱ्या या आपत्तींपासून वाचण्यासाठी भारताला 'डॉप्लर रडार'चे जाळे, सक्षम सॅटेलाईट नेटवर्क आणि प्रशिक्षित हवामान शास्त्रज्ञांची फळी उभी करून 'नेशन फर्स्ट' व 'ओन्ली सोल्युशन्स' या दृष्टिकोनातून सज्ज होणे गरज आहे. देशात ५५ डॉप्लर रडार स्टेशनची योजना आखण्यात आली असली तरी सध्या ३९ स्टेशन कार्यरत आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, सोलापूर व वरवळी (रत्नागिरी) या चार स्टेशनचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या म्हैसमाळ येथील स्टेशनचे काम सुरू आहे. मुंबई व नागपुरात 'एस-बॅण्ड', तर सोलापूर, वरवळी व म्हैसमाळ येथील डॉप्लर 'सी-बॅण्ड' आहेत. हे रडार त्याच्या चोहोबाजूंच्या परिसरात कार्यरत असते. 'एस-बॅण्ड' रडारची क्षमता २०० ते २५० किमी, तर 'सी-बॅण्ड'ची क्षमता ५०० ते ६०० किमी आहे.
डॉप्लर रडारचा फायदाहवामान बदलांचा वेध घेण्यासाठी उपग्रहाच्या माहितीसोबतच डॉप्लर रडारमधून मिळणारी माहिती अतिशय उपयुक्त ठरते. या प्रणालीद्वारे चक्रीवादळ, वादळ, ढगफुटी, अतिवृष्टी, गारपीट याचे अचूक पूर्वानुमान आपल्याला चार ते सहा तास अगोदर मिळते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नगदी पिकांसाठी होऊ शकतो. शिवाय, या काळात उपाययोजना करता येऊ शकते. या रडारमुळे ढगांमधील कण, त्यांची स्थिती (गडद होणार की विरुन जाणार), वाऱ्याचा वेग, दिशा व उंची, हवेतील बाष्प व बर्फाचे कण व पाण्याचे थेंब, त्यांचा आकार यासह इतर महत्त्वाच्या बाबींची अचूक माहिती मिळते.
डॉप्लर रडार यंत्रणेचा जन्मऑस्ट्रियातील भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन डॉप्लर हे १८४२ साली आकाशगंगेतील ग्रहताऱ्यांचा अभ्यास करीत होते. अचानक गणिती आकडेमोड करताना त्यांना एखादी वस्तू दूर जाताना किंवा जवळ येताना त्यावर रेडिओ लहरी सोडल्यास त्या परतताना त्यांची फ्रिक्वेन्सी (कंप्रता) बदलतात, असे त्यांच्या लक्षात आले. हा एक नवीन शोध होता, यालाच पुढे डॉप्लर इफेक्ट संबोधले जाऊ लागले. जून १९५८ मध्ये अमेरिकन संशोधक डेव्हिड होम्स आणि रॉबर्ट स्मिथ यांनी चक्रीवादळाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर इफेक्ट तत्त्वाचा वापर केला आणि पुढे हवामानाचा वेध घेण्यासाठी डॉप्लर रडारचा वेगाने प्रचार-प्रसार जगभर होऊ लागला.
विदर्भातील रडार गेले कुठे?म्हैसमाळ येथील रडारमुळे किमान ७२ लाख शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळू शकेल. म्हैसमाळसोबतच विदर्भात एक 'सी-बॅण्ड' डॉप्लर रडार मंजूर करण्यात आले. ते अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या रडारचे कार्यक्षेत्रात संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेशातील बैतूल, छिंदवाडा व बुरहानपूर तसेच तेलंगणातील आदिलाबाद, छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्हा आला असता. केवळ राजकीय अनास्थेमुळे वरुड तालुक्यात या रडार स्टेशनला जागा उपलब्ध करून दिली नसल्याने ते रडार मुंबईला नेण्यात आहे.
फ्रिक्वेन्सीचा उपयोग
- एल बॅण्ड/१ ते २ गिगा हर्टझ : पाऊस, मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहितीसाठी.
- एस बॅण्ड/२ ते ४ गिगा हर्टझ : जवळ व दूरच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी.
- सी बॅण्ड/४ ते ८ गिगा हर्टझ : अतिजवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी.
- एक्स बॅण्ड/८ ते १२ गिगा हर्टझ : हवेतल्या बाष्प, बर्फकण, पाण्याच्या थेंबांचा आकार व प्रकार तसेच ढगफुर्टीच्या माहितीसाठी.
- केयू/१२ ते १८ गिगा हर्टझ : ढगातील एकूण बर्फकण, पाणी, गारांच्या निर्मितीच्या वेगाच्या अचूक माहितीसाठी.