नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. या विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील ७७ व्या बॅचमधील अधिकाऱ्यांच्या (आयआरएस) दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ, प्रधान महासंचालक संजय बहादूर, एनएडीटीचे महासंचालक पी. सेल्वगणेश, अकादमीचे अतिरिक्त महासंचालक मुनिष कुमार, सीतारमप्पा कप्पट्टणवार आणि ७७ व्या तुकडीचे प्रशिक्षण संचालक प्रदीप एस प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी रॉयल भूतान सेवेच्या दोन अधिकाऱ्यांसह ८४ आयआरएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी १६ महिन्यांचे सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण केले.
पंकज चौधरी म्हणाले, भारत वेगाने वाढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतीय महसूल सेवा देशाच्या वित्तीय प्रशासनाचा मुख्य कणा आहे. अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कर अनुपालन, महसूल चुकवेगिरीला आळा आणि सहकारी भावनांना चालना मिळाली आहे. करसंकलन कार्यात अधिक दक्षता आणि पारदर्शकता येण्यासाठी डाटा मायनिंग, ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी दहा वर्षांत स्टार्टअप, मुद्रा, आवास योजना, आयुष्मान भारत योजना आदींसह अन्य यशस्वीरित्या राबवल्या. मुद्रा कर्ज योजनेत ५२ कोटी लोकांना ३३ लाख कोटी रुपयांचे विनातारण कर्ज दिले. ६८ टक्के महिलांनी योजनेचा फायदा घेतला.
प्रबोध सेठ म्हणाले, देशातील एकूण कर संकलनात ५० टक्के वाटा प्रत्यक्ष कराचा आहे. संजय बहादूर यांनी अधिकाऱ्यांना कर प्रशासकाची प्रतिज्ञा दिली. समीर राजा या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला सर्वाधिक सुवर्णपदके आणि मानाचे अर्थमंत्री सुवर्णपदकही मिळाले. कार्यक्रमाला आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी, ७७ व्या आणि ७८ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि एनएडीटीमधील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.