गुंतवणूकदारांच्या पैशांतून ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने घेतले चार्टर्ड प्लेन, चार वर्षांत असा रचला ट्रॅप
By योगेश पांडे | Updated: March 13, 2025 00:05 IST2025-03-13T00:04:27+5:302025-03-13T00:05:55+5:30
दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉइस फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते.

गुंतवणूकदारांच्या पैशांतून ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने घेतले चार्टर्ड प्लेन, चार वर्षांत असा रचला ट्रॅप
-योगेश पांडे, नागपूर
नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांसोबतच देशभरातील हजारो नागरिकांना ‘फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंट’ या कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ‘फाल्कन’च्या प्रमोटर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांचा अक्षरश: चुराडा केला असून, संचालक अमरदीप कुमार याने तर चार्टर्ड प्लेनदेखील विकत घेतले होते. महाराष्ट्रात पोलिसांनी अद्यापही हे प्रकरण गंभीरतेने घेतले नसले तरी देशातील काही शहरांत मात्र युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरू आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांची ‘फाल्कन’ने साडेतेरा लाखांची फसवणूक केली. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यावर खळबळ उडाली आहे. ‘फाल्कन’कडून व्हेंडर कंपन्यांचे इन्व्हॉइस ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जात होते.
दिवसाला ६ ते ८ कोटींचे इन्व्हॉइस फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंटच्या प्लॅटफॉर्मवर दिसायचे. यात गुंतवणूक केल्यावर गुंतवणूकदारांना ३० दिवस ते १८५ दिवसांत नफ्यासह रक्कम परत करण्याचे आमिष दिले जात होते. यातून अनेकांनी स्वत:च्या मेहनतीच्या कमाईचे करोडो रुपये यात टाकले. मात्र ‘फाल्कन’च्या कार्यालयांना टाळे लागले व त्यानंतर हा घोटाळा समोर आला.
संचालक अमरदीप कुमार याने गुंतवणूकदारांच्या पैशांतून २०२३ च्या अखेरीस चार्टर्ड प्लेन विकत घेतले होते. ते त्याने दुसऱ्या कंपनीच्या नावे दाखविले होते; परंतु उपयोग तोच करत होता. संबंधित चार्टर्ड प्लेनचा उपयोग एअर ॲम्ब्युलन्स म्हणूनदेखील सुरू झाला होता.
‘फाल्कन’चा संचालक एअर ॲम्ब्युलन्सने फरार?
फाल्कनचा संचालक अमरदीप सिंग मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून फरार आहे. तो वापरत असलेल्या चार्टर्ड प्लेनचा एअर ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोग करत तो दुबईला गेल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित विमान दुबईहून परतले होते व त्यानंतर कस्टम्सने त्याची तपासणी केली होती.
२०२१ पासून सुरू आहे गंड्याचा फंडा
२०२१ साली अमरदीप कुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘फाल्कन’च्या नावाने गुंतवणुकीची योजना लाँच केली. फाल्कन हे २०१५ मध्ये स्थापन झालेल्या कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेडअंतर्गत संचालित नोंदणीकृत नाव आहे.
तेव्हापासून अनेक सुशिक्षित, उच्चपदस्थ व श्रीमंत गुंतवणूकदार त्यांच्या गळाला लागले. ‘फाल्कन’ने गुंतवणूकदारांकडून जवळपास १७५० कोटींची गुंतवणूक मिळविली व त्यातील साडेआठशे कोटी सुरुवातीला परतदेखील केले.
मात्र उर्वरित पैसे कंपनीने घशात घातले असून, आता नागपुरातील न्यायाधीशांसारखे गुंतवणूकदार पैसे परत मिळतील की नाही या चिंताचक्रात अडकले आहेत. कंपनीच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, रोहतक इत्यादी ठिकाणच्या कार्यालयांना टाळे लागले आहे.