युवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ बनविणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 21:53 IST2022-09-13T21:52:50+5:302022-09-13T21:53:23+5:30
Nagpur News घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीच्या आंघोळीचा व्हिडीओ बनविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

युवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ बनविणाऱ्याला अटक
नागपूर : घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीच्या अंघोळीचा व्हिडीओ बनविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडीओ बनविताना आढळल्यानंतर त्याला परिसरातील नागरिकांनी चोप दिला होता व आरोपीने स्वत: त्यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली होती. यासंदर्भात चौकशीनंतर ही बाब समोर आली.
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखराम साहू (४२) हा कामगार राहतो. तरुणीच्या अंघोळीच्या वेळी गच्चीवर उभा राहून तो व्हिडीओ बनवत असे.
काही दिवसांपूर्वी तरुणीने त्याला व्हिडीओ बनविताना पाहिले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना तिने सांगितले व त्याला परिसरातील नागरिकांनी चोप दिला. दुखापत झाल्याने सुखरामने धंतोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपासात पोलिसांना मुलीची क्लिपिंग सुखरामनेच बनवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तरुणीला सुखरामविरुद्ध तक्रार करण्याचा सल्ला दिला. बदनामीचे कारण देत तिने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी सुखरामच्या तक्रारीवरून तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर सोमवारी तरुणीने सुखरामविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सुखरामला अटक केली आहे.