नागपूर : राज्यभरात इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा २ लाख २ हजार ८८३ जागांपैकी १ लाख ६६ हजार ७४६ जागांवर प्रवेश झाले आहेत. यंदा सुमारे ३५,९०० जागा रिक्त राहिल्या. इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यावर्षी २,२५,१६६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. यंदा एकूण १,६६,७४६ जागांपैकी १ लाख ४ हजार ५५० म्हणजेच ६२.७० टक्के जागा मुलांनी घेतल्या आहेत. म्हणजेच मुलांच्या प्रवेशात २ टक्क्यांनी घट झाली आहे. मुलींच्या संख्येत सुमारे १०,००० ने वाढ झाली आहे. यंदा ६२,१९५ म्हणजेच ३७.३० टक्के जागांवर मुलींनी प्रवेश घेतला आहे. गेल्यावर्षी १,८०,१७० उपलब्ध जागांपैकी फक्त १,४९,०७८ जागाच भरल्या गेल्या होत्या. तर ३१,०९२ जागा रिकाम्या राहिल्या होत्या. गेल्या वर्षी एकूण १,४९,०७८ जागांपैकी ९६,३२६ (६४.६१ टक्के) जागा मुलांनी आणि ५२,७५१ (३५.३८ टक्के) जागा मुलींनी घेतल्या होत्या.
या वर्षी विद्यार्थ्यांनी संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार, सिव्हिल, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स, आणि संगणक विज्ञान व इंजिनिअरिंग या शाखांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. संगणक विज्ञान, संगणक इंजिनिअरिंग, एआय-डाटा सायन्स, आयटी, एआय-एमएल या शाखांतील ८५ टक्क्यांहून अधिक जागा भरल्या गेल्या आहेत.
मोफत शिक्षण योजनांची हाेतेय मदत
- काही वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगमध्ये मुली फारशा येत नव्हत्या. त्यांचा कल पारंपरिक अभ्यासक्रमांसह मेडिकलशी संबंधित अभ्यासक्रमांकडे जास्त होता. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच मुलीही मुलांबरोबर पाऊल टाकत आहेत.
- जरी इंजिनिअरिंगमध्ये मुलांइतकी संख्या गाठायला वेळ लागेल, तरी २ टक्क्यांची वाढही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
- मुलींची संख्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढली आहे. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारकडून शिक्षणात दिलेली सवलत. सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं आहे. ट्यूशन फी पूर्णपणे माफ असल्याने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणं सुलभ झालं आहे. प्रवेशाच्या वेळी विकास शुल्कासह काही मोजकीच फी भरावी लागते. त्यामुळे पालकांसाठीही हे सोपं झालं आहे.