मंगेश व्यवहारे नागपूर : मागील २९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपती प्रा.राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. १९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे प्रा.राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देत राम शिंदेंनी पक्षाचे व विरोधकांचे आभार व्यक्त केले.
महायुतीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांनी त्याचा मान ठेवत माझ्या निवडीला पाठींबा दिला आहे. याबद्दल महायुती आणि विरोधकांचे आभार मानतो. राजकारणात चर्चा महत्त्वाची आहे. मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही माझे नाव मंत्री, प्रदेशाध्यक्ष यासाठी चर्चेत होते. मात्र, माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी मला योग्य सन्मान मिळवून दिला आहे. त्यांनी दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करेल, अशी भावना भाजपचे आमदार विधानपरिषद सदस्य राम शिंदे यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.