विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूवरदेखील मंथन हवे; माता अमृतानंदमयी देवी
By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 21:03 IST2023-03-20T21:01:43+5:302023-03-20T21:03:08+5:30
Nagpur News विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले.

विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूवरदेखील मंथन हवे; माता अमृतानंदमयी देवी
नागपूर : विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मात्र, त्यामुळे नकारात्मक पैलूदेखील समोर येत आहेत. हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण कार्यालयात काम करायला, रस्त्यांवर चालायलादेखील घाबरतात. विज्ञानातील बदलांच्या नकारात्मक बिंदूंवरदेखील मंथन व्हायला हवे, असे प्रतिपादन सी-२० (२०२३) च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी व्यक्त केले. जी-२० अंतर्गत नागपुरात आयोजित सी-२० परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि इंटरनेटच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन वाढले आहे. सध्या जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. परंतु, अनेकदा लोकांना नेमकी समस्या समजत नाही. अशा परिस्थितीत समस्या ओळखणे व त्या सोडविण्याची बुद्धिमत्ता तसेच मानसिक वृत्ती असणे या दोन क्षमता मनुष्यामध्ये असल्या पाहिजे. सार्वत्रिक कायद्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. आपण आपत्तीच्या वेळीच विचार करतो. कोविड साथीचा रोगदेखील असाच एक टप्पा होता. यावेळी लोकांनी भविष्यात आणखी चांगले काम करण्याचा संकल्प केला. परंतु, आता लोक परत जुन्या सवयींकडे वळले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.