बंदुकीच्या गोळीमुळे माकडाचा पाय झाला फॅक्चर
By दयानंद पाईकराव | Updated: June 7, 2024 15:25 IST2024-06-07T15:24:53+5:302024-06-07T15:25:54+5:30
उपचारासाठी ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये : एक्स रे’मध्ये आढळल्या दोन गोळ््या

The monkey's leg was fractured due to gunshot
नागपूर : बंदुकीच्या गोळ्या झाडल्यामुळे कळमेश्वर वन परिक्षेत्रातील एका माकडाचा मागील उजवा पाय फॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. शस्त्रक्रीयेनंतर हा माकड बरा झाल्यावर त्याला निसर्गमुक्त करण्यात येणार आहे.
कळमेश्वर वनपरिक्षेत्रात एक माकड मागील पायाने लंगडत असल्याची बाब वनपरिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या माकडाला पकडून बुधवारी ५ जूनला नागपूरातील ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. सेंटरमध्ये या माकडाचा एक्स रे काढण्यात आला असता या माकडाच्या मागील उजव्या पायात बंदुकीच्या दोन गोळ्या फसलेल्या आढळल्या. ऑपेशन करून या गोळ्या बाहेर काढाव्या लागणार आहेत. परंतु हा माकड खुप अशक्त झाला असल्याने सध्याच त्याच्यावर शस्त्रक्रीया करणे शक्य नाही. या माकडाची प्रकृती बरी झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रीया करून पायातील गोळ्या बाहेर काढण्यात येतील. त्यानंतर हा माकड चांगला झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी दिली. वन कर्मचाऱ्यांनी दखल घेऊन वेळीच या माकडाला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केल्यामुळे या माकडाचा जीव वाचला आहे.
अवैध बंदुक असलेल्यांचे काय ?
निवडणुकीच्या काळात पोलिस प्रशासनाने आवाहन केल्यानुसार बंदुकीचे शस्त्र असलेल्या व्यक्तींनी आपल्या बंदुक पोलिस ठाण्यात जमा केल्या. परंतु अवैधरित्या बंदुक बाळगणाऱ्या व्यक्तींकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. अवैध बंदुक बाळगणारे हे असामाजिक तत्व मुक्या प्राण्यांवर या शस्त्राचा वापर करीत असल्यामुळे पोलिसांनी अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्या जवळील शस्त्र जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.