मोबाईल सापडला, चोरटाही पकडला आता मोबाईल मालकाचा शोध घेण्याचा टास्क
By नरेश डोंगरे | Updated: September 8, 2023 21:07 IST2023-09-08T21:07:00+5:302023-09-08T21:07:28+5:30
तुमसरमध्ये चोरी, गोंदियात गुन्हा दाखल : राजनांदगावमध्ये सापडला आरोपी

मोबाईल सापडला, चोरटाही पकडला आता मोबाईल मालकाचा शोध घेण्याचा टास्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) 'टास्क टीम'ने एसी कोचमधून प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या भामट्याला लगेच जेरबंद केले. त्याच्याकडून अॅपलचा मोबाईलही जप्त करण्यात आला. मात्र, हा मोबाईल कुणाचा ते शोधण्याचा टास्क आता या टीमकडे आला आहे.
गुरुवारी छत्तीसगड एक्सप्रेसमधील एसी कोचमधून आरोपी किशोरकुमार उर्फ संतोष हिंमतलाल मांडले (वय २९, रा. दुर्ग) याने एक प्रवासी झोपेत असताना त्याचा अॅपल मोबाईल चोरला. दरम्यान, गाडी राजनांदगाव रेल्वे स्थानकावर आली असताना आरोपी मंडाले खाली उतरून सटकण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या संशयास्पद वर्तनामुळे 'राजनांदगाव आरपीएफच्या टास्क टीम'ने त्याला रोखले. त्याची चाैकशी सुरू करताच तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याजवळ असलेल्या अॅपल मोबाईलबाबतही तो समाधानकारक माहिती देत नसल्याने आरपीएफने त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चाैकशी केली.
यावेळी मात्र त्याने छत्तीसगड एक्सप्रेस मधून हा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. परिणामी तो मोबाईल जप्त करून त्याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दरम्यान, या मोबाईल चोरीची तक्रार गोंदिया पोलिसांकडे दाखल झाल्याचे कळाल्यामुळे मंडाले याला शुक्रवारी गोंदिया रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आता त्या मोबाईल मालकाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.
सतर्क रहा, संशयीताची माहिती द्या
रेल्वेत प्रवास करताना प्रवाशांनी सतर्क राहावे. आपल्या सामानाची काळजी घ्यावी आणि गाडीत अथवा रेल्वे स्थानकावर कुणी संशयीत दिसल्यास लगेच रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला माहिती द्यावी, असे आवाहन आरपीएफ दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभायीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे.