‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:46 IST2025-05-23T07:46:06+5:302025-05-23T07:46:06+5:30
नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.

‘सरकार’चा खात्मा झाल्याने माओवाद्यांची राजधानी हादरली
राजेश शेगाेकार, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : अबुझमाडच्या जंगलात २१ मे रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात माओवादी सुप्रीम कमांडर नंबाला केशवराव ऊर्फ बसवा राजू याचाही समावेश आहे. हा ‘माओ सरकार’ किंवा ‘जनताना सरकार’चा प्रमुख. त्याचाच अंत झाल्याने ही नक्षलविरोधी लढ्यातील ऐतिहासिक ठरली आहे. १६ दिवस चाललेल्या कर्रेगुट्टा मोहिमेत १४ मे राेजी ३१ नक्षलींचा खात्मा झाला व लाल गडावर तिरंगा फडकवल्यानंतर केवळ सहा दिवसांत अबुझमाडमध्ये निर्णायक कारवाई झाली. नीलम सराय, धोबी पहाड आणि कर्रेगुट्टा मोहिमांमुळे नक्षल्यांचे मनोधैर्य पार खचले आहे.
नक्षल्यांची राजधानी
१९८०च्या दशकात नक्षलवाद्यांनी अबुझमाड जंगलात प्रवेश केला. आज या भागात त्यांच्या ‘माओ सरकार’चा अघोषित अंमल आहे. केंद्रीय माओ नेत्यांच्या सुरक्षेसाठी बंकर, माओवादी सैनिकी शाळा व प्रशिक्षण कॅम्पही येथेच आहेत. अबुझमाड ही नक्षल्यांची राजधानी आहे.
कसे आहे अबुझमाड?
‘अबुझ’ म्हणजे माहिती नसलेले तर ‘माड’ म्हणजे उंच व रहस्यमय प्रदेश. दिवसाही सूर्याची किरणे पाेहोचत नाहीत असे हे दाट जंगल. भामरागडमधील बिनागुडापासून छत्तीसगडच्या दंतेवाडा, तेलंगणच्या खम्मम, ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत ४ हजार चौरस कि.मीटरमध्ये पसरले आहे.
माओवाद्यांचे प्रवेशद्वार बंद
दक्षिण गडचिरोलीचा परिसर छत्तीसगड व तेलंगणा सीमेला जोडून आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने दक्षिणवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी नेलगुंडा, पेनगुंडा व कवंडे या भामरागड तालुक्यातील सीमेवरील गावांमध्ये पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. त्यामुळे माओवाद्यांचे जिल्ह्यातील प्रवेशद्वार बंद झाले आहे.
...दलम निष्क्रिय
२०२४ पर्यंत गडचिरोलीत नक्षल्यांचे सहा दलम सक्रिय होते. त्यापैकी टिपागड व कसनसूर या दोन दलमचा खात्मा झाला आहे. अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे चारच दलम सक्रिय असले तरी नवीन भरती नसल्याने उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाले.
कर्रेगुट्टावर विजय मिळविल्यावर येथील नक्षलवाद्यांनी अबुझमाड येथे आश्रय घेतला हाेता. सुरक्षा दलाने निर्णायक कारवाई केली. यात माओ सरकाराचा सर्वाेच्च नेताच मारला गेल्याने या चळवळीचे कंबरडेच माेडले आहे. आता शस्त्र टाकण्याशिवाय नक्षल्यांसमाेर पर्याय नाही. - संदीप पाटील, महानिरीक्षक, नक्षलविराेधी अभियान महाराष्ट्र