काँग्रेस प्रदेश प्रतिनिधींच्या यादीवर अखेर शिक्कामोर्तब; १९ सप्टेंबरला मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 22:16 IST2022-09-15T22:15:40+5:302022-09-15T22:16:07+5:30
Nagpur News नागपूर शहरातून १८ तर ग्रामीणमधून १५ प्रदेश प्रतिनिधींना १९ सप्टेंबरला मुंबईत आयोजित बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

काँग्रेस प्रदेश प्रतिनिधींच्या यादीवर अखेर शिक्कामोर्तब; १९ सप्टेंबरला मुंबईत बैठक
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने अखेर नागपूर शहर व जिल्ह्यातील प्रदेश प्रतिनिधींच्या यादीवर शिक्कामोर्तब केल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. नागपूर शहरातून १८ तर ग्रामीणमधून १५ प्रदेश प्रतिनिधींना १९ सप्टेंबरला मुंबईत आयोजित बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ऑक्टोबरमध्ये होणार आहे. निवडणूक झाल्यास नागपुरातून या ३३ प्रतिनिधींना मतदान करण्याची संधी मिळणार आहे.
प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण चांगलेच तापले होते. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील गटाने दिल्ली गाठत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही यादीत फारसा बदल झालेला दिसत नाही. ब्लॉक अध्यक्ष राजू कमनानी यांच्या ऐवजी नितीन कुंभलकर यांचे नाव मात्र आले आहे. ग्रामीणच्या यादीत काहीच बदल नाही. महाराष्ट्राचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची बैठक १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहतील. या बैठकीत प्रदेश प्रतिनिधींना राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.
शहरातून वासनिक, पांडे, मुत्तेमवार
- नागपूर शहरातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, अनीस अहमद, अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव मुन्ना ओझा, शहर अध्यक्ष आ.विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा, उत्तर भारतीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, प्रशांत धवड, गिरीश पांडव, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, दीपक काटोले, नितीन कुंभलकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीणमधून केदार, गावंडे, मुळक
- ग्रामीणमधून प्रदेश प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आ. राजू पारवे, किशोर गजभिये, माजी जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, शाजा अहमद, मुजीब पठाण, मनोहर कुंभारे, तक्षशीला वाघधरे, प्रसन्ना तिडके, शांता कुमरे यांची निवड करण्यात आली आहे.