लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ नंतर उत्पादित सर्व नवीन वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले असले तरी अनेक वाहन विक्रेत्यांनी सुरुवातीला या नियमाला गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी सर्रासपणे साध्या नंबर प्लेट लावून वाहने ग्राहकांना दिली. राज्यभरात अशा वाहनांची संख्या तब्बल दहा लाखांहून अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. आता सर्व जुन्या वाहनांनाही 'एचएसआरपी' लावण्याची सक्ती केल्याने आणि ३० जून ही अंतिम तारीख असल्याने या निष्काळजीपणामुळे या वाहनचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुन्हेगारी कृत्यांसाठी वाहनांचा वापर आणि नंबर प्लेटमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यात २०१९ पासून नवीन उत्पादित वाहनांना 'एचएसआरपी' लावण्यात येत आहे. त्यानंतर परिवहन विभागाने २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांनाही ही नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यातील तीनही आरटीओ कार्यालयांमध्ये जवळपास २२ लाख जुनी वाहने आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल २०२५ पर्यंत केवळ एक लाख वाहनांनाच 'एचएसआरपी' लावण्यात आले आहे. यामागे आजही अपुरे असलेले फिटमेंट सेंटर्स हे कारण सांगितले जात आहे. अनेक वाहनचालकांना 'एचएसआरपी' बसवण्यासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागत आहे. लोकांच्या या गंभीर समस्येकडे अद्यापही परिवहन विभाग किंवा परिवहन मंत्र्यांचे लक्ष नाही, त्यात अनेक नव्या वाहनांना 'एचएसआरपी' नसल्याने नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकट्या नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालये मिळून अशी २० हजारांवर वाहने असल्याचे बोलले जाते.
विक्रेत्यांकडून एप्रिल ते जून २०१९ मध्ये दुर्लक्ष१ एप्रिल २०१९ नंतर सर्व नवीन वाहनांना 'एचएसआरपी' लावून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाहन कंपन्या आणि वाहन विक्रेत्यांची होती. मात्र, एप्रिल ते जून २०१९ या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये अनेक विक्रेत्यांनी या नियमाला गांभीर्याने घेतले नाही. आरटीओ कार्यालयानेही या काळात प्रभावीपणे लक्ष दिले नाही. आता 'एचएसआरपी' सक्तीची केल्याने आणि या वाहनांना कोणीच ही नंबर प्लेट लावून देण्यास पुढाकार घेत नसल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाहनचालक आरटीओचे मारत आहेत हेलपाटेएका त्रस्त वाहनचालकाने 'लोकमत'ला आपली व्यथा सांगितली. ते म्हणाले, २२ एप्रिल २०१९ रोजी एक कार खरेदी केली. त्यावेळी वाहन विक्रेत्याने 'एचएसआरपी' न लावता जुनी नंबर प्लेट लावून दिली. तेव्हा या नियमाबद्दल फारशी माहितीही नव्हती. आता जेव्हा प्रत्येक वाहनाला 'एचएसआरपी' लावणे बंधनकारक झाले आहे, तेव्हा ही नंबर प्लेट लावण्यासाठी वाहन विक्रेता आणि आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. मात्र, कोणीच यावर तोडगा काढायला तयार नाहीत.
वाहन विक्रेत्यांवर कारवाई करणार"१ एप्रिल २०१९ नंतर उत्पादित झालेल्या सर्व वाहनांना 'एचएसआरपी' लावण्याची जबाबदारी संबंधित वाहन कंपनी आणि वाहन विक्रेत्यांची आहे. हे स्पष्ट आदेश असतानाही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वाहन विक्रेत्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल."- विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन विभाग