वेश्याव्यवसायात ढकललेली बालिका स्वत:च पोहोचली पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 22:52 IST2022-09-16T22:51:53+5:302022-09-16T22:52:29+5:30
Nagpur News चार वर्षाच्या वयातच तिला घरातून पळवून आणून गंगा-जमुनात विकण्यात आले. वयात आल्यावर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. अखेर तिने हिंमत केली व स्वत:च पोलीस ठाणे गाठत आपबिती मांडली.

वेश्याव्यवसायात ढकललेली बालिका स्वत:च पोहोचली पोलीस ठाण्यात
नागपूर : खेळण्या बागडण्याच्या चार वर्षाच्या वयातच तिला घरातून पळवून आणून गंगा-जमुनात विकण्यात आले. त्यानंतर दहा वर्ष देहविक्रय अड्ड्याची साफसफाई, भांड घासणे व इतर घरकामांसाठी तिला राबविण्यात आले व वयात आल्यावर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. तिला या यातना नकोशा झाल्याने अखेर तिने हिंमत केली व स्वत:च पोलीस ठाणे गाठत आपबिती मांडली.
या प्रकरणात पोलिसांनी देहविक्रयाचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला अटक केली आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची असून दहा वर्षांअगोदर तिच्या घराच्या अंगणातून चॉकलेटचे आमिष दाखवत पळविण्यात आले होते. संबंधित व्यक्तीने तिला नागपुरात आणून गंगा जमुनामध्ये एका महिलेला विकले. त्यानंतर ती तेथेच राहू लागली. तिच्याकडून दिवसभर काम करवून घेतले जात होते व तिला पोटभर जेवणदेखील दिले जात नव्हते. १० वर्ष अत्याचार सहन केल्यावर तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. ती यामुळे प्रचंड निराश झाली होती. तिने परिसरातीलच एका मुलीला हा प्रकार सांगितला. तिच्या सल्ल्यावरून तिने लकडगंज पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी लगेच संबंधित अड्ड्यावर धाड टाकत महिलेला अटक केली.