देशातील पहिले संविधान प्रास्ताविका पार्क नागपुरात

By आनंद डेकाटे | Updated: June 26, 2025 20:18 IST2025-06-26T20:13:43+5:302025-06-26T20:18:58+5:30

Nagpur : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

The country's first Constitution Preamble Park is in Nagpur. | देशातील पहिले संविधान प्रास्ताविका पार्क नागपुरात

The country's first Constitution Preamble Park is in Nagpur.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ (विधी महाविद्यालय) येथे उभारण्यात आलेले देशातील पहिले संविधान प्रास्ताविका पार्क लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. या पार्कसह महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते शनिवार २८ जून रोजी होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती शताब्दी वर्ष अर्थपूर्ण व प्रभावीपणे साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने घेतला होता. सर्व विद्यापीठात विविध उपक्रम आयोजित करून जयंती वर्ष साजरे करण्याची निर्देश दिले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नागपूर विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धिविनायक काणे, तत्कालीन कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम, महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांच्या पुढाकारातून प्रास्ताविका पार्कची संकल्पना उदयास आली. प्रस्ताव मंजूर करून २३ नोव्हेंबर २०१५ मध्ये लोकनिधी,विद्यापीठ निधी व शासन निधी उभारण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. विद्यापीठाने गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही, तत्कालीन महापौर तथा आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. नितीन राऊत, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार प्रकाश गजभिये, तत्कालीन उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांच्यासह विस्तारित समितीतील सदस्य आ. मोहन मते, आ. समीर मेघे यांनी संविधान प्रास्ताविका पार्क निर्मितीच्या कार्याला गती दिली. सामाजिक न्याय विभागाकडून २ कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला. शासनाकडून मिळालेल्या निधीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला तसेच प्रास्ताविका पार्क मधील इतर बाबी तयार करण्यात आल्या. विद्यापीठाने स्वनिधीतून संरक्षण भिंत आणि महाद्वार तयार केले.
 

भव्य प्रवेशद्वार, संविधानिक मुल्यांचे म्यूरल्स
संविधान प्रास्ताविका पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. प्रास्ताविका पार्कमध्ये संविधान प्रास्ताविकेतील भारतीय संविधान, आम्ही लोक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आदी दहा मुल्यांचे भित्तिचित्रे (म्युरल्स) लावण्यात आले आहे. प्रास्ताविका पार्कमध्ये लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणजेच राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोक स्तंभ देखील तयार करण्यात आला आहे. संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा २ एकर परिसरात निर्माण करण्यात आला आहे. या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले आहे.
 

Web Title: The country's first Constitution Preamble Park is in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर