पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 21:24 IST2022-04-16T21:24:28+5:302022-04-16T21:24:58+5:30
Nagpur News पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे स्पष्ट केले.

पेट्रोकेमिकल्स रिफायनरीबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार
नागपूर : केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी रत्नागिरी येथे रिफायनरीसह पेट्रोकेमिकल्स काॅम्प्लेक्ससाठी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच यासाठी निश्चित झालेली रत्नागिरीच्या राजापूर येथील बारसूस्थित १३०० एकर जागा उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. विदर्भात हा प्रकल्प येण्याच्या शक्यतेसाठी हा झटका असल्याचे बोलले जाते. आता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीसुद्धा चेंडू केंद्र सरकारच्या पारड्यात टाकला आहे. हा प्रकल्प कुठे होणार याचा निर्णय केंद्र सरकार व प्रवर्तक कंपन्यांनाच करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
देसाई यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले की, राज्य सरकारला या प्रकल्पासाठी केवळ जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात रिफायनरी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हा प्रकल्प कोकणातील नाणार येथे उभारण्याचा निर्णय झाला होता; परंतु ते शक्य होऊ शकले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात प्रकल्प आणण्याची मागणी करीत पत्र लिहिले; परंतु प्रवर्तक कंपनी आणि केंद्र सरकारलाच नेमका प्रकल्प कुठे करायचा ती जागा निश्चित करायची आहे. या कामासाठी एक समिती गठित करण्यात आलेली आहे. समितीच्या मताप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भात दहा हजार कोटींची गुंतवणूक
देसाई यांनी विदर्भात १० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असल्याचा दावा केला. ११ उद्योग प्रत्येकी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत. याशिवाय यवतमाळ व एका ऑस्ट्रेलियन कंपनीसोबत वीज संयंत्रांसाठी करार झाला आहे.
समृद्धी महामार्गाजवळ विकसित होणार औद्योगिक क्षेत्र
देसाई यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जागा निश्चित करण्यासाठी एमएसआरडीसी आणि एमआयडीसीने आराखडा तयार केला आहे. कृषी आधारित उद्योगांवर भर दिला जाणार आहे.