नागपुरात भरदुपारी द बर्निंग बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 21:53 IST2022-03-08T21:53:00+5:302022-03-08T21:53:33+5:30
Nagpur News नागपूर शहरात मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ५५ प्रवासी असलेल्या महापालिकेच्या आपली बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.

नागपुरात भरदुपारी द बर्निंग बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
नागपूर : शहरातील गिट्टीखदान पोलीस चौकीजवळ मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ५५ प्रवासी असलेल्या महापालिकेच्या आपली बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली.
महापालिकेच्या आपली बस ताफ्यातील एम.एच.३१, सीए ६१०२ क्रमांकाची बस गिट्टीखदानहून मोरभवनकडे जात असताना पोलीस चौकीजवळ शॉर्टसर्किटमुळे बसने अचानक पेट घेतला. बसचालक रूपेश भिवलकर याने लगेच बस रस्त्याच्या बाजूला उभी करून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात सिव्हिल लाईन्स येथील अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या व जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ८० टक्के बस जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली. त्यात डिझेलचा पाईप लीकेज असल्याने आगीचा भडका उडाला. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. दूरवरून ही आग दिसत होती. बसमधील प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून कुणालाही दुखापत झाली नाही. बसची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे.