लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी मंदिरात लग्न करणारी महिला १५ दिवसांतच घरातून फरार झाली. हे तिचे दुसरे लग्न होते व जाताना ती पैसे व दागिने घेऊन फरार झाली. तिचा जागोजागी शोध घेणाऱ्या तरुणाला आता तिच्या पहिल्या पतीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत तरुणाची बोळवण केली आहे. त्यामुळे मला न्याय कुठे मिळेल, असाच प्रश्न तो तरुण विचारतो आहे.
जगदीश नावाचा तरुण हा नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गणेशपेठेतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तेव्हा त्याची तेथील हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या पूजा नावाच्या महिलेशी ओळख झाली. तिचे लग्न झाले होते व तिला दोन मुले होती. मात्र, याची माहिती असूनदेखील जगदीशने तिला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे टेकडी गणेश मंदिरात लग्न झाले. त्यानंतर ते कामठीत भाड्याच्या घरी राहायला गेले.
२ फेब्रुवारी रोजी त्यांनी नातेवाइकांसमोर थाटामाटात लग्न करण्याचे ठरविले. मात्र, १६ नोव्हेंबर रोजी जगदीश आंघोळीला गेला असताना पूजा मुलांसह घरातून गायब झाली. जगदीशने सामान तपासले असता त्याच्या खिशातून २५ हजार रुपये, तसेच सोन्याचे दागिने गायब होते. तिचा फोनदेखील स्वीच ऑफ होता. जगदीशने तिचा भाऊ, बहीण यांनादेखील फोन लावला. मात्र, त्यांनी काहीच माहिती दिली नाही. त्यानंतर तिचा पती विनोदने फोन करून शिवीगाळ केली, तसेच रेल्वेस्थानकावर दोनदा गाठून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर जगदीशने रेल्वे पोलिस ठाणे, नंदनवनसह तीन ठिकाणी तक्रार केली. मात्र, प्रत्येक वेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याचीच नोंद केली आहे. त्यामुळे मला कोण न्याय देणार, असाच सवाल तो पोलिस अधिकाऱ्यांना करतो आहे.