ते 'स्वीस' खाते फेक, सायबर यंत्रणा फेल; फेक पोस्टचा मुद्दा पटोले यांनीच सभागृहात मांडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:24 IST2025-12-15T10:23:42+5:302025-12-15T10:24:53+5:30
स्वीस बँकेतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या खात्यात कोट्यवधींचा निधी असल्याची फेक पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकच गदारोळ झाला.

ते 'स्वीस' खाते फेक, सायबर यंत्रणा फेल; फेक पोस्टचा मुद्दा पटोले यांनीच सभागृहात मांडला
नागपूर : स्वीस बँकेतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या खात्यात कोट्यवधींचा निधी असल्याची फेक पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकच गदारोळ झाला. काँग्रेसचे सभागृहातील नेते नाना पटोले यांच्या खात्यात ५०० कोटी रुपये असल्याचा खळबळजनक दावा करणाऱ्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
खुद्द पटोले यांनी सभागृहाचे लक्ष याकडे वेधले. ते म्हणाले, त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची नावे स्वीस बँक खात्यांशी जोडत कोट्यवधी रुपयांची रक्कम असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे पटोले यांनी सभागृहात राज्याच्या सायबर गुन्हे शाखेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संबंधितांचा शोध घेऊ : मुख्यमंत्री
यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, व्हॉट्सअॅप आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जात आहेत. ही पोस्ट कोणी तयार केली आणि पसरवली, याचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.