१३ कोटींच्या कर्जाचे आमिष : कापड व्यापाऱ्याचे २६ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:23 IST2019-07-18T23:22:00+5:302019-07-18T23:23:05+5:30
कपडा व्यापाऱ्याला १३ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांचे २६ लाख रुपये हडपले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी अकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल झाला.

१३ कोटींच्या कर्जाचे आमिष : कापड व्यापाऱ्याचे २६ लाख हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कपडा व्यापाऱ्याला १३ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांचे २६ लाख रुपये हडपले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी अकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल झाला. आशिष सतीश जैन (वय ४३) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
जैन तहसीलच्या मस्कासाथमध्ये राहतात. त्यांचे गांधीबागमधील हॅण्डलूम मार्केटमध्ये कपड्याचे दुकान आहे. आरोपी ताहिर शमीमुल्ला खान (रा. हॅण्डलूम मार्केट, गांधीबाग) हा जैन यांच्याकडे खातेपुस्तिका (अकाऊंट) लिहिण्याचे काम करायचा. त्यामुळे जैनसोबत आरोपी खानची ओळख होती. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिक अडचणीमुळे जैन कर्ज घेण्यासाठी इकडे तिकडे संपर्क करीत होते. खान याला त्यांची अडचण लक्षात येताच त्याने आपले मुंबईत काही आर्थिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संबंध असून, ते विनातारण मोठ्या रकमेचे कर्ज कमीत कमी व्याजदराने उपलब्ध करून देतात, अशी थाप मारली. जैन यांनी त्याला मुंबईतील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून देण्यास सांगितले असता आरोपी खान याने त्यांना मुंबईत नेले. तेथे म्हाडा मेरेथॉन टॉवर, लोअर परेलमध्ये राहणारा राधाकृष्ण ठोंबरे याची ओळख करून दिली. ठोंबरेने आपण मोठा आर्थिक कारभार सांभाळणाऱ्या संस्थेत प्रतिनिधी म्हणून काम करतो. आमची संस्था मोठ्या रकमेचे कर्ज कोणतेही तारण न ठेवता उपलब्ध करून देते, असे जैन यांना सांगितले. जैन यांनी आपल्याला एक कोटी रुपयांचे कर्ज हवे असल्याचे सांगितले. आपल्या व्यवसायाचा ताळेबंदही आरोपींकडे दिला. तो बघितल्यानंतर आरोपी खान आणि ठोंबरेने जैन यांना तुम्हाला १३ कोटींचे कर्ज मिळू शकते, अशी थाप मारली. ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कारणाखाली जैन यांच्याकडून १ नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०१९ या कालावधीत तब्बल २६ लाख रुपये उकळले. आरोपींनी जैन यांना कधी बँक खात्यात तर कधी रोख स्वरूपात रक्कम मागितली. तब्बल अडीच ते तीन वर्षे होऊनही आरोपी कर्जाची रक्कम देत नसल्यामुळे जैन यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता आरोपी खान आणि ठोंबरेचा कुठल्याही आर्थिक संस्थेसोबत संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.