भयावह! कोविड सेंटरमध्ये २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:43+5:302021-04-17T04:08:43+5:30
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील वरोडा नजीकच्या कोविड केअर सेंटर येथे गत २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य ...

भयावह! कोविड सेंटरमध्ये २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू
कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील वरोडा नजीकच्या कोविड केअर सेंटर येथे गत २४ तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य औषधोपचार मिळाला नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांच्यावतीने करण्यात आला आहे.
चिरकूट भगवान पाटील (५७) रा.सेलू , लक्ष्मी अजाबराव ठाकरे (७०) रा.कळमेश्वर, ज्ञानेश्वर मेश्राम (५६) रा. कळमेश्वर, शंकर विठ्ठल गणोरकर (५२) रा.लिंगा, श्रीराम राजाराम खसारे (६६) रा.घोराड अशी गुरुवारी मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहे. शुक्रवारी रमेश रामक्रिष्णा किरपाल (४०) रा. कळमेश्वर या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पाच रुग्णांचे मृतदेह गुरुवारी दुपारनंतर कोविड सेंटरमध्येच होते. येथे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने शेवटी मृतांच्या नातेवाईकांनी रात्री मृतदेह सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. याप्रसंगी मृतांच्या नातेवाईकांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यावर राग अनावर झाल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद क्षमविला. या सर्व रुग्णांच्या पार्थिवावर शुक्रवारी कळमेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९ मार्चपासून सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एकूण तीन डॉक्टर आणि तीन नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी एक नर्स सध्या पॉझिटिव्ह आल्याने सध्या दोनच नर्स येथे कार्यरत आहेत.
१०० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ६० रुग्णावर उपचार सुरु आहेत. यातील १० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील चार रुग्णांना ऑक्सिजन लागले आहे. येथे रुग्णावर योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप आहे. येथे रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे.
केवळ थातूरमातूर उपचार
दीड लाखांची लोकसंख्या असलेल्या कळमेश्वर तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे. मात्र वरोडा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणारी योग्य यंत्रणा नाही. यासोबतच आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीचाही अभाव आहे. येथे पूर्णवेळ डॉक्टर कधीच उपलब्ध नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
--
वरोड्याच्या कोविड सेंटरमध्ये गुरुवारी रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मरचुरी मध्ये ठेवण्यात आले. रात्री कोविड सेंटर येथे रुग्णांच्या नातेवाईक आले असताना खंडविकास अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. सर्व मृतदेहावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुळात कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची जबाबदारी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची आहे. संबंधिताना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यानंतर असा प्रकार घडणार नाही.
सुजाता गावडे, नायब तहसीलदार, कळमेश्वर