विशेष परीक्षेने वाढविला ताण
By Admin | Updated: August 18, 2014 00:39 IST2014-08-18T00:39:37+5:302014-08-18T00:39:37+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

विशेष परीक्षेने वाढविला ताण
नागपूर विद्यापीठ : परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी हैराण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना लावण्यात आले आहे. परंतु यामुळे नियमित निकाल व पुढील परीक्षांच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अगोदरच मनुष्यबळाची कमतरता असताना हा अतिरिक्त भार कसा काय सांभाळायचा, असा प्रश्न हैराण झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अजूनही पूर्णपणे लागलेले नाहीत. अनेक महाविद्यालयांत प्रथम वर्षांत विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, परंतु विद्यार्थ्यांची नामांकन नोंदणी हवी त्या प्रमाणात झालेली नाही. त्यातच विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या तसेच हिवाळी परीक्षा आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होतील. याचे वेळापत्रक तयार करणे इत्यादी अनेक कामे पूर्णत्वास जायची आहे. अशा स्थितीतच हिवाळी परीक्षेचा अतिरिक्त ताण आल्याने कर्मचारी व अधिकारी हैराण आहेत.
शिवाय या परीक्षेकडे सगळ्यांचेच लक्ष लागल्याने यात कुठलीही चूक होणे महागात पडू शकते याची जाणीव सर्वांनाच आहे. त्यामुळे नियमित काम सोडून यावर लक्ष केंद्रित करावे लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रशासनाने काढलेल्या ‘गप्प बसा’ या परिपत्रकाचा दाखला देत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)