मेंदूतून काढला टेनिसबॉल आकाराचा ट्युमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:51+5:302021-01-03T04:11:51+5:30
नागपूर : मेंदूच्या मध्यभागी (व्हेलम इंटरपोजिटम मिनिनजोमा) असलेल्या तब्बल टेनिसबॉलच्या आकाराच्या ट्युमरमुळे वृद्ध महिलेला सामान्य जीवन जगणे कठीण झाले ...

मेंदूतून काढला टेनिसबॉल आकाराचा ट्युमर
नागपूर : मेंदूच्या मध्यभागी (व्हेलम इंटरपोजिटम मिनिनजोमा) असलेल्या तब्बल टेनिसबॉलच्या आकाराच्या ट्युमरमुळे वृद्ध महिलेला सामान्य जीवन जगणे कठीण झाले होते. परंतु डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याच्या बळावर अतिशय गुंतागुंतीची व दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केली. आतापर्यंत १० हून कमी रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया झाल्याचे न्युरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी यांचे म्हणणे आहे.
डॉ. गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेला ज्येष्ठ रुग्णामधील हा सर्वात मोठा ट्युमर आहे. ६१ वर्षीय ज्येष्ठ महिला ही गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी, कमकुवत होत असलेली दृष्टी व चालताना सुटणारा तोल या समस्येने ग्रस्त होती. याशिवाय डावा हात व पायातील ताकद कमी झाली होती. ‘एमआरआय’मध्ये मेंदूच्या मध्यभागी दोन वेंट्रिकलच्या दरम्यान (तिसऱ्या व्हेंट्रिकलवर) ‘६.७’, ‘५.६’, ‘५.५’ आकाराचा ट्युमर होता. साधारण टेनिस बॉलच्या आकाराचा होता. याला वैद्यकीय भाषेत ‘व्हेलम इंटरपोजिटम मिनिनजोमा’ असे म्हणतात. वैद्यकीय अभ्यासानुसार, आतापर्यंत १० पेक्षा कमी रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया झाल्या. परंतु या सर्वांच्या तुलनेत हा सर्वात मोठा ट्युमर होता. ट्युमरच्या भवताली असलेल्या न्युरोव्हॅस्कुलर स्ट्रक्चर म्हणजे मेंदूच्या पेशी व रक्तवाहिन्यांच्या गुंतागुंतीमुळे ही शस्त्रक्रिया आणखी अवघड आणि गुंतागुंतीची झाली होती. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठ रुग्णांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जाण्याचा धोका असतो. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्णाची स्थिती अगदी स्थिर आहे. डोकेदुखी पूर्णपणे थांबली आहे. रुग्ण सगळ्यांना ओळखू लागला आहे. डाव्या हातापायामध्येदेखील ताकद प्राप्त होत आहे, असेही ते म्हणाले.
ही शस्त्रक्रिया डॉ. गिरी यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजोग गजभिये, डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. आदमने, डॉ. तुषार येळणे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. डॉ. गिरी म्हणाले, मेंदूची प्रत्येक शस्त्रक्रिया ही असाधारण असते. परंतु ही शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती. ती यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने माझ्यासह चमूला मानसिक समाधान मिळाले.