राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी दहा हजार झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:35+5:302021-01-13T04:20:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०१६ सालापासून नागपूर जिल्ह्यात सुमारे दीडशे किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना सुरुवात झाली. या ...

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी दहा हजार झाडांची कत्तल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१६ सालापासून नागपूर जिल्ह्यात सुमारे दीडशे किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना सुरुवात झाली. या महामार्गांसाठी अनेक ठिकाणी रस्ते रुंदीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक झाडे तोडण्यात आली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत नागपूर जिल्ह्यात प्राधिकरणाने किती रस्ते बांधले, यांच्यासाठी किती निधीची तरतूद होती व किती रक्कम खर्च झाली, रस्त्यांच्या कामासाठी किती झाडे तोडण्यात आली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या कालावधीत नागपूर जिल्ह्यात एकूण १४९.५१५ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली. यात चौपदरी व सहापदरी मार्गांचा समावेश होता. त्यापैकी ६७.७१ किलोमीटर म्हणजेच ४५.२९ टक्के मार्गांची कामे पूर्ण झाली. रस्ते रुंदीकरणासाठी या कालावधीत १० हजार २४१ झाडे तोडण्यात आली. सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गावर २ हजार ८८८ तर नागपूर-उमरेड चौपदरी महामार्गासाठी ४ हजार ७३४ झाडे तोडण्यात आली.
४७ टक्के रक्कम खर्च
नागपूर जिल्ह्यातील १० विविध प्रकल्पांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३ हजार २४४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. यापैकी १५५१ कोटी ८९ लाख (४७ टक्के) रुपयांचा निधी खर्च झाला आहे.