ढगाळ वातावरणामुळे पुन्हा तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:01+5:302021-04-16T04:09:01+5:30
नागपूर : नागपुरातील हवामान गुरुवारी दिवसभर ढगाळलेले होते. दुपारी थोडा पाऊसही झाला. यामुळे दिवसभरातील तापमान ४.७ अंश सेल्सिअसने खालावून ...

ढगाळ वातावरणामुळे पुन्हा तापमानात घट
नागपूर : नागपुरातील हवामान गुरुवारी दिवसभर ढगाळलेले होते. दुपारी थोडा पाऊसही झाला. यामुळे दिवसभरातील तापमान ४.७ अंश सेल्सिअसने खालावून ३४.१ वर पोहोचले. तापमान ६ अंशांनी घटल्याने वातावरण थंडावले.
नागपुरातील हवामानात मागील तीन दिवसांपासून बदल झाला आहे. बुधवारच्या रात्री १० वाजेनंतर शहरात बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे तापमान २२ अंशावर आले होते. सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार, शहरामध्ये १.२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशालगतच्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणामध्ये हा बदल झाला आहे. पुढील दोन दिवस आकाश ढगाळलेले राहणार असून एक-दोन ठिकाणी पाऊसही येण्याची शक्यता आहे. गुरुवारी गोंदियातील तापमान ३३.२ अंश सेल्सिअस असे सर्वात कमी होते. वाशिम जिल्ह्यात ३० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. तसेच, अमरावतीमध्ये ८.६ मिमी, अकोल्यात २.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नागपुरात सकाळी वातावरण ढगाळलेले होते. ऊनही कमी- अधिक पडल्याने तापमान फारसे वाढले नाही. वातावरण कोरडे असल्याने सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४८ टक्के होती. सायंकाळी त्यात घट होऊन २७ टक्क्यांवर गेली.