सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:32+5:302021-06-20T04:07:32+5:30

उमरेड : कोरोनाच्या महामारीत विदारक परिस्थितीत अल्प मानधनावर आम्ही रात्रंदिवस एक करीत सेवाकार्य केले. सेवाभाव जपला. जीव मुठीत ठेवत ...

Tell me, what crime have we committed? | सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

सांगा, आम्ही काय गुन्हा केला?

उमरेड : कोरोनाच्या महामारीत विदारक परिस्थितीत अल्प मानधनावर आम्ही रात्रंदिवस एक करीत सेवाकार्य केले. सेवाभाव जपला. जीव मुठीत ठेवत अनेकांचे प्राण वाचविले. आम्हाला ‘कोरोना योद्धा’ सुद्धा संबोधल्या गेले. आता कोरोना रुग्ण कमी झाले. याकारणावरुन कोविड केअर सेंटर, डीसीएचसी तथा डीसीएच बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यातही कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे, असे आदेशात नमूूद आहे.

खासगी आरोग्य यंत्रणा केवळ पैशात माणुसकी मोजत असताना आम्ही २४ तास सेवाभाव जपला. सांगा, आम्ही काय गुन्हा केला, असा सवाल कोविड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी विचारीत आहेत. उमरेड तालुक्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद २२ जून २०२० रोजी झाली. त्यानंतर उमरेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह येथे कोविड सेंटर सुरू केले. पहिल्या लाटेत याठिकाणी उत्तम व्यवस्था केल्या गेली. पहिली लाट ओसल्यानंतर हे सेंटर बंद करीत उमरेड तालुक्यातील रुग्णांना भिवापूरच्या ट्रामा सेंटरमध्ये हलविल्या जात होते. लोकमतने या गंभीर प्रश्नाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले. त्यानंतर २३ मार्च २०२१ ला स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे कसेबसे कोविड सेंटर सुरू झाले. अशातच नूतन आदर्श महाविद्यालयातील क्रीडा संकुलात ८० बेडचे कोविड सेंटर सुरू झाले. या संपूर्ण कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ७३१ कोरोना रुग्णांवर औषधोपचार केल्या गेले. बऱ्याचदा मोठे अधिकारी नसतानाही अटीतटीच्या परिस्थितीत कंत्राटी मनुष्यबळाने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखविली आहे. अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग या कर्मचाऱ्यांच्या सोबतीला आहेत. आता काम कमी झाले म्हणून कंत्राटी मनुष्यबळास कामावरून कमी करा असा आदेश अन्यायच असल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत तातडीने निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.

या चमूने लढविला किल्ला

उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये एकूण १३ परिचारिका, ३ वैद्यकीय अधिकारी, तसेच फॉर्मासिस्ट, टाटा एन्ट्री ऑपरेटर, लेबॉरेटरी तंत्रज्ञ प्रत्येकी एक आणि तीन वॉर्डबॉय कंत्राटी म्हणून कर्तव्य पार पाडत होते. या संपूर्ण चमूने जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार केला. उत्तम पद्धतीने किल्ला लढविला. त्यांच्या कार्याचे कौतुक अनेक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. शिवाय आ. राजू पारवे यांनी सुद्धा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर केले होते.

तिसरी लाट आल्यास

प्रशासनाची पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत तारांबळ उडाली होती. काही खासगी कोविड सेंटरमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आकारणीच्या अनेक तक्रारी झाल्यात. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुद्धा उजेडात आला. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांना बेड मिळाले नाहीत. औषधोपचार वेळीच न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा कठिण परिस्थितीत दुसरी लाट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कशीबशी आटोक्यात आली. असे असले तरी तिसरी लाट आल्यास पुन्हा नागरिकांची गैरसोय होईल, असे बोलले जात असून आरोग्य विभागाच्या आदेशामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आदेश रद्द करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Tell me, what crime have we committed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.