सांगा ! ही नावे चुकीचीकशी ?
By Admin | Updated: June 7, 2014 02:23 IST2014-06-07T02:23:44+5:302014-06-07T02:23:44+5:30
अ. भा. मध्यवर्ती मराठी नाट्य परिषदेच्यावतीने दरवर्षी नाट्य क्षेत्रात

सांगा ! ही नावे चुकीचीकशी ?
नाट्य परिषद नागपूर शाखेच्या सदस्यांची संतप्त भूमिका : काही लोकांतर्फे दिशाभूल करण्याचा प्रयत्न
नागपूर : अ. भा. मध्यवर्ती मराठी नाट्य परिषदेच्यावतीने दरवर्षी नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कलावंतांसह ज्येष्ठ कलावंतांना पुरस्कृत करण्यात येते. नाट्य परिषदेने यंदा एकूण २१ नावे या पुरस्कारांसाठी पाठविली होती. त्यातील तीन कलावंतांना पुरस्कार जाहीर झाले. पण नाट्य परिषदेच्या नियामक मंडळातील सदस्य मात्र अपात्र कलावंतांची नावे पाठविल्याचा आरोप करून नाट्य परिषदेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे केवळ नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीचाच नव्हे तर तमाम वैदर्भीय कलावंतांचा अवमान करण्याचे पातक ‘त्या’ सदस्याने केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीने व्यक्त केली आहे.
काही लोकांना हाताशी धरून काही कलावंतांची नावे अयोग्य श्रेणीत पुरस्कारासाठी पाठविण्यात आल्याचा आरोप करीत वैदर्भीय कलावंतांचा अवमान करण्यात येत असल्याने काही कलावंतही व्यथित झाले आहेत. पुरस्कार लाभणे वा न लाभणे, हा मुद्दाच नाही. पुरस्कार लाभल्यानेच एखादा कलावंत मोठा होतो, असेही नाही. नागपूर शाखेने पाठविलेल्या २१ नावांपैकी तीन कलावंतांना पुरस्कार मिळाले. पण त्या तीन कलावंतांनाही आपल्यामुळेच पुरस्कार मिळाल्याच्या भ्रमात नियामक मंडळाचे सदस्य आहेत. गुणवंत घटवाई यांचे नाव संगीत नाटक अभिनय आणि गायन या श्रेणीत पाठविले होते. पण काही महाभागांना घटवाई फक्त गायक म्हणूनच माहीत आहेत. त्यांनी आतापर्यंत ११0 नाटकांत भूमिका केल्याचे त्यांच्या गावीही नाही. त्यामुळे आपले अज्ञान उघड करून ते स्वत:चेच हसे करून घेत आहेत. जे लोक इतर कलावंतांवर आक्षेप घेऊन त्यांच्यावर आगपाखड करीत आहेत, त्यांचे नाट्य क्षेत्रात काहीही योगदान नसताना आपण नाट्यशास्त्रज्ञ असल्याचा खोटाच आव आणण्याचा त्यांचा अभिनय सपशेल अपयशी होतो आहे. रोशन नंदवंशी एक चांगला बालनाट्य दिग्दर्शक आहे, चारु जिचकार उत्कृष्ट ध्वनिमुद्रणकार आणि पार्श्वसंगीतकार आहेत. जनार्दन लाडसे यांनी अनेक संगीत नाटकात तबलावादन केले आहे. लिखाणात हेमंत मानकर यांना राज्य शासनाने पुरस्कृत केले आहे. अशोक मगरकर आणि गणेश नायडू यांचे नेपथ्य, प्रकाशयोजनेतील योगदान कुणीही नाकारूच शकत नाही. अनिल पालकरने अभिनयात अनेकदा आपली चुणूक दाखविली आहे. नाट्य परिषदेने पुरस्कारासाठी पाठविलेली ही नावे कशी चुकीची आहे, ते सांगण्याचे धाडस आरोप करणार्यांजवळ नाही.
नाटकांविषयी काहीही माहिती नसलेली, अभ्यास नसलेली माणसे सर्रास आरोप करीत सुटतात तेव्हा संताप येतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पण अशीच माणसे आपण महान नाट्यसमीक्षक असल्याचा आव आणून आपल्याच कलावंतांचे नुकसान करीत असतात. कायम पुण्यामुंबईचे गुणगान करून स्वनामधन्य होणार्या या लोकांना वैदर्भीय कलावंतांविषयी आस्था नसल्याने केवळ श्रेय लाटण्यासाठी आणि स्वत:चा स्वार्थ साधण्यापलीकडे काहीही करायचेच नसते. विदर्भात प्रथमच व्यावसायिक रंगभूमीची मुहुर्तमेढ रोवताना समीर पंडित व्यावसायिक पद्धतीने समोर आले. त्यांनी काही नाटकांची निर्मिती केली. त्यांना प्रोत्साहन देतानाच विदर्भात निर्माते तयार व्हावेत आणि व्यावसायिक वातावरणनिर्मिती करण्यासाठी पंडित यांचे नाव कार्यकारिणीने पाठविले होते. त्यात काहीही चूक नाही. पण नाटकांसाठी दमडीही खर्च न करता फुकटात नाटके पाहण्याची इच्छा ठेवणारे तथाकथीत काही लोक नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेला अकारण वादात ओढत आहे, असे कार्यकारिणी सदस्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
आरोप करणार्यांनी स्वत:ला सिद्ध करावे
काही लोक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताची नावे पुरस्कारासाठी पाठविल्यावरही त्यावर आक्षेप घेत आहेत. ही संताप आणि मनस्ताप देणारी बाब असून यामुळे आपण व्यथित झालो आहोत. यामागे नागपुरातील नियामक मंडळ सदस्य आहेत. विदर्भातल्या कलावंतांच्या मागे एकजुटीने उभे राहण्यापेक्षा कलावंतांचे कर्तृत्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा अशा लोकांनी करू नये. कलावंतांची संपूर्ण माहिती घेऊनच त्यांनी विधाने केली पाहिजे. किमान ज्येष्ठ कलावंतांचा अवमान त्यांनी टाळायला हवा.
प्रफुल्ल फरकसे
अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखा