लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून बाबा आष्टणकर यांना हटविण्यात आल्यावर तेली समाज संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध तेली समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून तेली समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तेली समाजाला प्रतिनिधित्व नाकारून काँग्रेस कशी मजबूत होणार, असा सवालही या संघटनांनी केला आहे.
संताजी युवक मंडळाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास काचोरे, संताजी तेली संघटनेचे अरुण टिकले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बळवंतराव मरघडे, तेली समाज संघटना नागपूर जिल्ह्याचे राजू तुरणकर, संताजी युवक ब्रिगेड नागपूर जिल्ह्याचे राजेश झाडे, तेली बांधव समाज संघटना नागपूर जिल्ह्याचे जनार्धन मेहर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, बाबा आष्टणकर हे तेली समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायला फक्त सात महिनेच मिळाले. या काळात त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम राबविले. आंदोलने केली. त्यांनी कामाचा सपाटा लावल्यामुळे राजकीय द्वेषापोटी गटाचे राजकारण करणारे माजी मंत्री सुनील केदार यांनी अ. भा. संघटन महासचिव के. सी वेणुगोपाल यांच्या मदतीने आष्टनकर यांना हटविले. त्यामुळे जिल्ह्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. केदार यांनी जिल्हा बँक घोटाळ्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी भाजपाशी छुपी युती केली असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.
बैस यांच्या नियुक्तीवर केदार समर्थकही नाराज
आष्टणकर यांना हटविण्यात जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आलेले अश्विन बैस हे ३१ वर्षांचे युवक आहेत. त्यांना पक्ष संघटनेचा अनुभव नाही. ते साधी ग्रामपंचायतचीही निवडणूक लढलेले नाहीत. अशा अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या हाती जिल्हा काँग्रेसची धुरा दिल्यामुळे केदार समर्थकदेखील नाराज आहेत. पण, दबावापोटी कुणी उघडपणे बोलत नाही, असा दावाही तेली समाज संघटनांनी केला आहे.
तेली समाज काँग्रेसपासून दुरावण्याचा धोका
नागपूर शहर व जिल्ह्यात तसेही तेली समाजाचे मोजकेच प्रतिनिधी काँग्रेस पक्षात आहे. तेली समाजाला पाहिजे त्या प्रमाणात काँग्रेस पक्षात वाव नसल्याने तेली समाज भाजपाकडे झुकलेला आहे. बाबा आष्टणकर यांनी तेली समाजाला काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम सुरू केले होते. परंतु, कोणतेही कारण नसताना त्यांना पदावरून हटविणे म्हणजे तेली समाजाचा अपमान आहे, अशी नाराजी व्यक्त करीत असेच सुरू राहिले तर काँग्रेसला तेली समाजाची मते नको आहेत का, असा प्रश्न तेली समाज संघटनांनी उपस्थित केला आहे.