गावांमध्ये तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक
By Admin | Updated: June 7, 2015 02:40 IST2015-06-07T02:40:26+5:302015-06-07T02:40:26+5:30
देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

गावांमध्ये तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक
नितीन गडकरी : कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन विषयावर चर्चासत्र
नागपूर : देशाच्या विकासासाठी गावागावांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पोहचणे आवश्यक आहे. यामुळे तेथील लोक सक्षम होतील. भूमी अधिग्रहण कायदा या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. गावात कंपन्या आल्या तर शेतकऱ्यांना रोजगार मिळेल. युवकांना मजबुरीने शहरात येऊन रिक्षा ओढण्याची गरज भासणार नाही. शेतकऱ्यांसाठी कोणते तंत्रज्ञान फायद्याचे आहे यावर काम होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
कृषी मंत्रालय अंतर्गत आय.सी.ए.आर.-जी. टी. सी. सिरकॉट, नागपूर इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट मुंबई, अॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पऱ्हाटी व शेती कचऱ्याचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अमरावती रोड येथील राष्ट्रीय माती सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोच्या डॉ. एस.पी. चौधरी सभागृहात आयोजित या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील कृषी वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयसीएआर मुंबईचे संचालक डॉ. पी.जी. पाटील, इंडियन सोसायटी फॉर इम्प्रुव्हमेंट मुंबईचे सचिव डॉ. ए.जे. शेख, अॅग्रोप्लस फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष जी.एच. वैराळे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशात मजूर, शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर चिंताजनक आहे. यावर विचार करून योग्य पाऊल न उचलल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानासोबतच ‘इकोनॉमी वायोब्लिटी’चे होणेही आवश्यक आहे. देशात रोजगाराची समस्या मोठी आहे. आणि सर्वात जास्त रोजगार ग्रामीण भागात निर्माण करण्याची खरी गरज आहे. परंतु दुर्भाग्यपूर्ण मागील अनेक वर्षांपासून ज्या नीतीवर आम्ही चाललो त्यामुळे गावाचा विकास तर दूर राहिला, उलट तो खुंटला. परिणामी २८ टक्के लोकसंख्येला गावातून शहरात येणे भाग पडले. विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीतजास्त संधी उपलब्ध होतील असे कार्य करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात कृषीवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आभार डॉ. ए.जे. शेख यांनी मानले.(प्रतिनिधी)