लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी ‘डिजी यात्रा’ अॅपच्या सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. बोर्डिंग पास मिळवण्यासाठी प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.सकाळी ७ ते १० या वेळेत इंडिगो एअरलाइन्सच्या तीन उड्डाणांवर या बिघाडाचा परिणाम झाला. डिजी अॅपद्वारे वेब चेक-इन केलेल्या सर्व प्रवाशांना संपूर्ण प्रक्रिया मॅन्युअली पार पाडावी लागली. काही वेळानंतर सर्व्हरमधील अडचण दूर करण्यात आली. मात्र, त्यादरम्यान शेकडो प्रवासी हैराण झाले.
सीटा सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे समस्याएअरलाइन्सकडून मिळणारा डेटा सीटा एअरपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये एक्सेस न झाल्याने ही समस्या निर्माण झाली. सकाळच्या सुमारास देशातील अन्य विमानतळांवरही अशाच प्रकारची अडचण निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘डिजी यात्रा’मुळे वाचतो वेळ‘डिजी यात्रा’ अॅपमध्ये नोंदणी केल्यास प्रवाशांची ओळख पडताळणी स्वयंचलित पद्धतीने पूर्ण होते. त्यामुळे डिपार्चर गेट किंवा बोर्डिंग गेटवर प्रवाशांना आधारकार्ड किंवा अन्य कुठलाही ओळखपत्र दाखवण्याची गरज भासत नाही. विमानतळावर खास डिजी यात्रा गेट बसवण्यात आले आहे. प्रवासी आपले चेहरे स्कॅनिंग गेटसमोर दाखवताच गेट आपोआप उघडते आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण होते. केवळ सीआयएसएफकडून सुरक्षा तपासणीसाठी फ्रिस्किंग प्रक्रियेतून जावे लागते. या अॅपच्या वापरामुळे प्रवाशांचा किमान २० मिनिटांचा वेळ वाचतो, तसेच एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनाही सुविधा होते.
आठ महिन्यांपूर्वी सुरू झाली सेवानागपूर विमानतळावर सीटा सॉफ्टवेअरवर आधारित ‘डिजी यात्रा’ प्रणाली आठ महिन्यांपूर्वी सुरू झाली. सध्या इंडिगो एअरलाइन्स आणि एअर इंडिया या सेवाचा वापर करीत आहेत. मिहान इंडिया लिमिटेडने प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विमानतळ परिसरात विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. सुरुवातीला केवळ ६-७ टक्के प्रवासी या सुविधेचा वापर करत होते, मात्र आता ही टक्केवारी २० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.