शिक्षकांना शाळेत बोलाविण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:17+5:302021-04-17T04:07:17+5:30
लोकमत इम्पॅक्ट नागपूर : शासनाने १४ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद राहतील, असे ...

शिक्षकांना शाळेत बोलाविण्याची गरज नाही
लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : शासनाने १४ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद राहतील, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. तरीसुद्धा मुख्याध्यापक, संस्थाचालक ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर, हजेरी लावण्याच्या नावावर शिक्षकांना शाळेत बोलावून दोन ते पाच तास बसवून ठेवत होते. शाळेत शिक्षकांच्या अनावश्यक उपस्थितीमुळे शिक्षकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत होते. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘शाळा बंद, पण शिक्षक शाळेत’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी तात्काळ पत्र काढून शिक्षकांना अनावश्यक शाळेत बोलावू नये, असे आदेश दिले आहे.
शिक्षण उपसंचालकांनी विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की, लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये. मात्र आपात्कालीन सेवेसाठी घेण्यात आलेले शिक्षक तसेच परीक्षाविषयक कामकाजातील शिक्षक यांना नियुक्त केलेली कामे करावीच लागेल. परीक्षाविषयक मूल्यमापनाची कामे व ऑनलाईनसंबंधित कामे ही सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावी. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये.
शिक्षण उपसंचालकाच्या पत्राचा आधार घेत, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना स्पष्ट बजावले की, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये.