शिक्षकांनीच लिहून दिली इंग्रजीची उत्तरपत्रिका; भंडारा जिल्ह्यातील वलनीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:16 IST2018-03-20T17:13:41+5:302018-03-20T17:16:04+5:30
शिक्षकांनीच अख्खी उत्तरपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांच्या हाती दिल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या एका विद्यालयात दहा दिवसांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे.

शिक्षकांनीच लिहून दिली इंग्रजीची उत्तरपत्रिका; भंडारा जिल्ह्यातील वलनीतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी शिक्षण विभाग एकीकडे आटोकाट प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शिक्षकांनीच अख्खी उत्तरपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांच्या हाती दिल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातल्या एका विद्यालयात दहा दिवसांपूर्वी घडल्याचे उघड झाले आहे. याच विद्यालयातील एका धाडसी शिक्षकांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रबद्ध केल्याने हे बिंग आता फुटले आहे.
८ मार्च रोजी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. आपल्या संस्थेचा निकाल चांगला लागावा यासाठी एका विद्यालयातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परिक्षा एक्सटर्नल कंडक्टरला हाताशी धरून हा प्रकार केल्याचे कळते. ही प्रश्नपत्रिका शाळेत पोहचताच परिक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी सर्व शिक्षकांनी मिळून त्याची आदर्श उत्तरपत्रिका तयार केली व ती विद्यार्थ्यांना सामुहिक कॉपी करण्यासाठी वाटली. हा सगळा प्रकार घडत असताना, तो न पटल्याने व त्याविरुद्ध त्यावेळी कुठलाच आवाज उठवणे शक्य नसल्याने एका शिक्षकाने तो प्रकार चित्रबद्ध केला. त्यांनी तात्काळ ती चित्रफीत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे दिली. मात्र त्याला दहा दिवस लोटूनही काहीच कारवाई न झाल्याने या कारवाईत शिक्षण विभागाचाच तर हात नाही ना अशी शक्यता वर्तविली जाऊ लागली होती.
दरम्यान हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या कानावर गेल्याने त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरविले आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे सुरु केले. पवनीच्या गटशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांची यासंदर्भात भेट घेतली असता त्यांनी, आतापर्यंत आपल्याकडे अशी लेखी तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले व फक्त तोंडीच तक्रार होत असल्याचे म्हटले. तथापि, या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळवून त्याची शहानिशा नक्कीच होईल असे आश्वासन घोडेस्वार यांनी दिले आहे.