हिंगणा : भरधाव टिप्परने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालक तरुण शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा-नागपूर मार्गावरील राजीवनगरात बुधवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
कविलाल गयाराम पटले (३५, रा. लडी लेआऊट, वानाडाेंगरी, ता. हिंगणा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वानाडाेंगरी येथे शिकवणी वर्ग घेत असून, गुड्डू सर नावाने ओळखले जायचे. ते दुपारी एमएच-४०/एएफ-२५०८ क्रमांकाच्या दुचाकीने वानाडाेंगरीहून नागपूरला जायला निघाले हाेते. दरम्यान, राजीवनगरात विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या एमएच-३१/एफसी-६२२८ क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून टिप्परचालक गाेविंद शिवचरण टेंभरे, रा. आर्शीवादनगर, खडगाव, नागपूर यास ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास एमआयडीसी पाेलीस करीत आहेत.