१ एप्रिलपासून करवाढ लागू
By Admin | Updated: January 15, 2015 00:54 IST2015-01-15T00:54:39+5:302015-01-15T00:54:39+5:30
कर वाढीचा संबंधित प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत ठेवून नंतर महपालिका सभागृहात मंजूर केला जाईल. त्यानंतर १ एप्रिल २०१५ पासून करवाढ लागू होईल. करात नेमकी किती वाढ होईल,

१ एप्रिलपासून करवाढ लागू
मनपा : शहराची सहा भागात विभागणी
नागपूर : कर वाढीचा संबंधित प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत ठेवून नंतर महपालिका सभागृहात मंजूर केला जाईल. त्यानंतर १ एप्रिल २०१५ पासून करवाढ लागू होईल. करात नेमकी किती वाढ होईल, याची निश्चित माहिती कुणीही द्यायला तयार नाही. असे असले तरी तज्ज्ञांनुसार करात तब्बल ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय मालमत्ता करात मलजल लाभ कर, पाणी लाभ कर तसेच पथ कर असे तीन नवे कर समाविष्ट करण्यात आले आहेत. यापूर्वी आकारण्यात येणारा एक टक्के दिवाबत्ती कर रद्द करण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीमध्ये वार्षिक भाडे मूल्य (एएलवी) ला आधार मानण्यात आले असून रेडिरेकनरनुसार कर वसुली होणार नाही हे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. आता शहराची सहा भागात विभागणी करून त्या वर्गीकरणाच्या आधारावर कर वसुली केली जाईल.
कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख यांनी सांगितले की, नव्या कायद्यानुसार येत्या आर्थिक वर्षात लागू करावयाच्या कर प्रणालीची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करून तिला महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक आहे. नागपूरकरांचे हित विचारात घेऊन नवी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ती सभागृहात सादर केली जाईल. सभागृहाला त्यात सुधारणा करण्याचा अधिकार असून सभागृहाच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल. नव्या कायद्यानुसार तीन नवे कर लागू करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते लागू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाडेकरू असतील तर अधिक कर आकारला जात होता. याची दखल घेत यासाठी एक नवा नियम तयार करण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)