उद्दिष्ट २५० कोटींचे वसुली मात्र १८५ कोटी

By Admin | Updated: April 2, 2017 02:32 IST2017-04-02T02:32:50+5:302017-04-02T02:32:50+5:30

मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

The target of 250 crores is only 185 crores | उद्दिष्ट २५० कोटींचे वसुली मात्र १८५ कोटी

उद्दिष्ट २५० कोटींचे वसुली मात्र १८५ कोटी

अभय योजनेत मिळाले ३५ कोटी : गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक वसुली
नागपूर : मालमत्ता कराच्या थकबाकीची वसुली व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यात १६ ते ३१ मार्च या कालावधीत एकमुस्त थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत ३५ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ३१ मार्च अखेरीस एकूण १८५ कोटींची कर वसुली झाली आहे.
स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २०१६-१७ या वर्षात ३०६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु महापालिका निवडणूक व कर आकारणीबाबतचा संभ्रम यामुळे देयके वाटपाला विलंब झाला. याचा परिणाम कर वसुलीवर झाल्याने आयुक्तांनी सुधारित अर्थसंकल्पात २५० कोटींचे उत्पन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु सुधारित अर्थसंकल्पानंतर एकच महिना शिल्लक असल्याने १०० कोटींची वसुली शक्य झाली नाही.
गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ताकरापासून १७४ कोटी ९ हजारांची वसुली झाली होती. यात १२६ कोटी नियमित तर १३० कोटी थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आले होते. यावर्षी १८५ कोटींची कर वसुली झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ती ११ कोटींनी अधिक आहे.
अभय योजनेपूर्वी शहरातील १ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांकडे १९१ कोटींची थकबाकी होती. आता ही संख्या कमी झाली आहे. नोटाबंदीच्या कालावधीत ३० कोटी तर अभय योजनेतून ३५ कोटी प्राप्त झाले. अशा प्रकारे ६५ कोटींचा महसूल झाला. त्यानंतरही अपेक्षित २५० कोटींचा आकडा गाठता आलेला नाही. (प्रतिनिधी)

वेतनवाढ रोखणार
मालमत्ता कराची थकबाकी व वसुली याचा झोननिहाय आढावा घेतला जात आहे. यात कमी वसुली झालेल्या झोनच्या सहायक आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास संबंधित झोनमधील करवसुली विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची वेतन वाढ रोखली जाणार आहे, असे संकेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.

 

Web Title: The target of 250 crores is only 185 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.