नागपूर जिल्ह्यातील भांडारबोडी येथे टँकरने बालकास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 07:37 PM2017-12-30T19:37:23+5:302017-12-30T19:44:12+5:30

वेगात जाणाऱ्या टँकरने रोड ओलांडणाऱ्या १० वर्षीय बालकास धडक देत चिरडले. शिवाय, ताबा सुटल्याने टँकर रोडच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रोडच्या मध्यभागी टायर जाळून रोष व्यक्त केला.

Tanker crushed child at the Bhandarbodi in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील भांडारबोडी येथे टँकरने बालकास चिरडले

नागपूर जिल्ह्यातील भांडारबोडी येथे टँकरने बालकास चिरडले

Next
ठळक मुद्देसंतप्त नागरिकांनी जाळले टायर

आॅनलाईन लोकमत
नागपूर : वेगात जाणाऱ्या टँकरने रोड ओलांडणाऱ्या १० वर्षीय बालकास धडक देत चिरडले. शिवाय, ताबा सुटल्याने टँकर रोडच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रोडच्या मध्यभागी टायर जाळून रोष व्यक्त केला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक - तुमसर (जिल्हा भंडारा) मार्गावरील भांडारबोडी येथील बसथांब्याजवळ शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
राजेश नंदकिशोर तरारे (१०, रा. भांडारबोडी, ता. रामटेक) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. राजेश हा भांडारबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकायचा. त्याचे आई - वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तो शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे बसथांबा परिसरात मित्रांसोबत खेळत होता. खेळताना तो रोड ओलांडत असतानाच तुमसरहून रामटेकच्या दिशेने वेगात येत असलेल्या एमएच-२९/एम-८५१ क्रमांकाच्या टँकरने त्याला उडविले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तर, नागरिक येत असल्याचे पाहताच चालकाने वेग वाढवून टँकरसह पळ काढला. या धावपळीत त्याचा ताबा सुटला आणि टँकर परिसरातील राखी तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या रोडच्या कडेला उलटला. त्याच चालकाने टँकर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे करीत आहेत.

नागरिकांचा ‘रास्ता रोको’
राजेश हा एकुलता एक असून, त्याला दामिनी नावाची मोठी बहीण आहे. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रोडवर टायर जाळून ‘रास्ता रोको’ करायला सुरुवात केली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी लोहीत मतानी व तहसीलदार धर्मेंद्र फुसाटे यांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही अधिकाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले. या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याची मागणीही यावेळी राजेशची आजी सुमित्रा तरारे यांच्यासह नागरिकांनी केली.

Web Title: Tanker crushed child at the Bhandarbodi in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.