पत्नीला व्हिडीओ कॉलद्वारे विचारली घटस्फोटाची सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:10 IST2019-01-16T01:06:56+5:302019-01-16T01:10:33+5:30
न्यायालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हळूहळू वाढत आहे. १४ जानेवारी रोजी कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश एस.ए. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीशी संपर्क साधून तिची पतीला घटस्फोट देण्याची तयारी असल्याची खात्री करून घेतली व त्यानंतर आपसी सहमतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची विधी वर्तुळात प्रशंसा झाली.

पत्नीला व्हिडीओ कॉलद्वारे विचारली घटस्फोटाची सहमती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हळूहळू वाढत आहे. १४ जानेवारी रोजी कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश एस.ए. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीशी संपर्क साधून तिची पतीला घटस्फोट देण्याची तयारी असल्याची खात्री करून घेतली व त्यानंतर आपसी सहमतीने घटस्फोट झाल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची विधी वर्तुळात प्रशंसा झाली.
प्रकरणातील दाम्पत्य उच्च शिक्षित असून दोघेही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. पती मूळचा नागपूरचा तर, पत्नी हैदराबादची आहे. २०१३ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस गुण्यागोविंदाने संसार केला. दरम्यान, त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. मतभेदाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे त्यांना एका छताखाली एकत्र राहणे कठीण झाले. परिणामी, पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केला. त्यामध्ये दाम्पत्याने आपसी सहमतीने वाद संपवून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागपुरात येणे अशक्य झाल्यामुळे पत्नीने तिच्या सख्खया भावाला निर्णयाचे सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार, पत्नीच्या भावाने व पतीने न्यायालयात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने पत्नी खरेच घटस्फोटासाठी तयार असल्याची व्हिडीओ कॉलद्वारे खात्री करून घेतली. पतीतर्फे अॅड. समीर सोनवणे तर, पत्नीतर्फे अॅड. स्मिता सिंगलकर यांनी कामकाज पाहिले.