पर्यावरणाचे काम करणाऱ्यांची टवाळी करूनका

By Admin | Updated: November 19, 2014 00:48 IST2014-11-19T00:48:44+5:302014-11-19T00:48:44+5:30

पर्यावरणाचे संतुलन राखणे किती गरजेचे आहे, हे अद्यापही लोकांना कळलेले नाही. निसर्गाचे शोषण करून आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. त्याची उदाहरणेही आता आपल्याला दिसत आहेत.

Taking care of environmental workers | पर्यावरणाचे काम करणाऱ्यांची टवाळी करूनका

पर्यावरणाचे काम करणाऱ्यांची टवाळी करूनका

गिरीश गांधी : ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शनाचा समारोप
नागपूर : पर्यावरणाचे संतुलन राखणे किती गरजेचे आहे, हे अद्यापही लोकांना कळलेले नाही. निसर्गाचे शोषण करून आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. त्याची उदाहरणेही आता आपल्याला दिसत आहेत. पण अद्याप समाजात म्हणावे तितके गांभीर्य नाही. पर्यावरणासाठी स्वत: काही करीत नसाल तर किमान पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी काम करणाऱ्यांची टवाळी करू नका, असे मत पर्यावरणाच्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.
‘आपली वसुंधरा’ या गेले तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाचा समारोप आज करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. हे प्रदर्शन स्वरसाधना संस्थेच्यावतीने आणि वनविभाग, वनराई फाऊंडेशन, महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ऊर्जा विकास अभिकरण महाराष्ट्र, निसर्ग विज्ञान मंडळ, विज्ञान भारती, विदर्भ रोझ सोसायटी, ग्राहक पंचायत, पं. दीनदयाल उपाध्याय आरोग्य समिती, आंतरभारती आश्रम आदी विविध संस्थाच्या सहकार्याने पूर्णचंद्रराव बुटी सभागृहाच्या आवारात आयोजित करण्यात आले होते.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरभारती, दाभा आश्रमाचे संचालक भाउसाहेब झिटे तर प्रमुख अतिथी म्हणून श्याम देशपांडे, किशोर मिश्रीकोटकर, चैतन्य मोहाडीकर उपस्थित होते. गांधी म्हणाले, मी कामाला प्रारंभ केला तेव्हाही लोक हसायचे. पण रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली, शहरात ठिकठिकाणी केवळ वृक्षारोपण न करता त्या वृक्षांचे संगोपन केले. हे काम वाढत गेले म्हणूनच त्याचा परिणामही आज दिसतो आहे. हे काम सातत्याने करीत राहणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना नागरिकांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. या प्रदर्शनातून नागरिकांपर्यंत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पोहोचविण्याचा एक यशस्वी प्रयत्न झाला, त्याचे समाधान खूप मोठे आहे. मानवी गरजांसाठी काही प्रमाणात निसर्गाची मदत लागतेच पण त्यापेक्षा दहापट पर्यावरण राखण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. हे प्रदर्शन आयोजित करणे सोपी बाब नाही. पण बाबासाहेब उत्तरवारांनी निर्माण केलेली ही संस्था मोहाडीकर, देशपांडे, घुगे यांनी हातात घेऊन समाजोपयोगी कार्याला प्रारंभ केला आहे. निसर्गाशी प्रतारणा केली तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्याचे प्रत्यंतर अनेक बाबींमधून आता येते आहे. त्यामुळे अग्रक्रमाने पर्यावरणासाठी आपण सारेच समोर आलो पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भाऊसाहेब झिटे म्हणाले, माणसाचे शरीरही निसर्गातूनच निर्माण झाले आहे. त्यामुळे शरीरात काही बिघाड झाला तर त्याचे उपायही निसर्गातच आहेत. निसर्गाची पूजाच आपण बांधली पाहिजे. पण उन्मादात आपण निसर्गाचे नुकसान करीत आहोत. नैसर्गिक नियमांचे पालन केले तर आरोग्य सुदृढ राहते. निसर्गाप्रति आपण अजूनही फारसे जागरूक नाही. या प्रदर्शनातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न झाला. याप्रसंगी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चित्रफितीच्या माध्यमातून या साऱ्या आयोजनाला शुभेच्छा दिल्या.
चैतन्य मोहाडीकर म्हणाले, आपली वसुंधरा प्रदर्शनाची संकल्पना काहींना बोलून दाखविल्यावर ती अनेकांना रुचली नाही. पण श्याम देशपांडे, घुगे आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. हे केवळ प्रदर्शन नव्हते तर ही एक चळवळ आहे. त्यामुळेच सर्व स्वयंसेवी संस्थांनी या प्रदर्शनाला सर्वोपरी सहकार्य केले. गिरीश गांधी यांनी आर्थिक बाबतीत कमी पडू दिले नाही. व्यवसायाचा उद्देशही या प्रदर्शनात नव्हता. आ. अनिल सोले या आयोजनाचे कार्याध्यक्ष होते. अनेक अडचणींच्या वेळी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. सर्वांच्या सहकार्यानेच हे प्रदर्शन यशस्वी होऊ शकले, याचे समाधान हेच आम्हा सर्वांचे फळ आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी रायलू यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Taking care of environmental workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.