लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ज्या मालमत्ताधारकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरला नाही, अशा थकबाकीदारांवर आता कारवाईच करा, असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात मनपा मुख्यालयातील सभागृहात बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिरिक्त उपायुक्त मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, गणेश राठोड, अशोक गराटे, सहायक आयुक्त हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, विकास रायबोले, विजय थूल, प्रमोद वानखेडे, यांच्यासह दहाही झोनचे कर संग्राहक, कर अधीक्षक उपस्थित होते. बैठकीत गोयल म्हणाल्या की, कर संकलनासाठी नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी अभय योजना सुरू केली आहे.
४० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असलेल्यांवर कारवाई ज्या मालमत्ताधारकांनी थकीत पैसे भरले त्यांचे अभिनंदन करावे. कोणत्या भागात अधिक कर वसूल करता येईल यावर लक्ष द्यावे. ज्या कर निरीक्षक व कर संग्राहकाचे उद्दिष्टाच्या तुलनेत ४० टक्केपेक्षा कमी वसुली आहे, त्यांचेवर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.
जप्तीचा अहवाल नियमित सादर करा करसंग्रह आणि मालमत्ता जप्ती करण्याकरिता झोन सहायक आयुक्तांनी नियोजन करावे. याकरिता कर विभागाला आवश्यक मनुष्यबळ आणि वाहने द्यावी. मालमत्ता कर थकीत रक्कम वसूल होईस्तोवर वारंट कार्यवाही करावी, वारंट कार्यवाहीमध्ये थकीत रक्कम वसूल होत नसल्यास संबंधित थकबाकीदाराची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून अटकावणी करावी. दररोज कार्यवाहीचा अहवाल उपायुक्त कार्यालय सादर करावा.