मोर्चेकऱ्यांची योग्य काळजी घ्या
By Admin | Updated: December 9, 2014 00:58 IST2014-12-09T00:58:03+5:302014-12-09T00:58:03+5:30
अधिवेशन कालावधीत अनेक जिल्ह्यांतून मोर्चे येतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी, तसेच मंत्रिमहोदयांनी मोर्चाला भेट देण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे,

मोर्चेकऱ्यांची योग्य काळजी घ्या
सभापती-अध्यक्षांच्या सूचना : घेतला व्यवस्थेचा आढावा
नागपूर : अधिवेशन कालावधीत अनेक जिल्ह्यांतून मोर्चे येतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची योग्य काळजी घेण्यात यावी, तसेच मंत्रिमहोदयांनी मोर्चाला भेट देण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे दिल्या.
उद्या, सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबतचा आढावा आज रविवारी त्यांनी संयुक्तपणे घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होेते. विधानभवनाच्या मंत्री परिषद दालनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी मोर्चेकरी आणि मंत्र्यांच्या भेटीची वेळ जुळेल या पद्धतीने नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर जे मोर्चेकरी रात्री मुक्कामी राहतील, त्यांच्या निवासाची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली असून, त्या ठिकाणी मोबाईल प्रसाधनगृह आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी दिली. (प्रतिनिधी)
भोजनाची गुणवत्ता राखा
आमदार निवासामध्ये चांगले जेवण मिळत नाही, अशी आमदारांची तक्रार असते. यावर्षी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अधूनमधून भेटी द्याव्यात. भोजनाची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदाराला तसे निर्देश द्यावेत. तसेच अधिवेशन कालावधीत सुरक्षेसाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येते. मात्र या कर्मचाऱ्यांचे निवास व भोजन व्यवस्था नीट नसल्याच्या बातम्या माध्यमातून येतात. तेव्हा यावर्षी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करताना याची नीट काळजी घ्यावी, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिल्या.