नागपुरातील हातमजुराच्या मुलीची ‘घे भरारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:20 IST2018-06-09T15:20:09+5:302018-06-09T15:20:30+5:30
घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांच्या हातमजुरीवर कुटुंबाचे दोन वेळचे भरणारे पोट. ना अभ्यासाला आवश्यक पुस्तके, ना सरावासाठी योग्य साहित्य. फक्त मनात अभ्यास करण्याची ओढ होती अन् स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला संकल्प. याच बळावर तिने गरिबीच्या अडथळ्यांवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश अक्षरश: खेचून आणले. मनात जिद्द असली अन् अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली तर अशक्यप्राय वाटणारे व अडथळ्यांनी भरलेले शिखरदेखील सहजपणे सर करता येते हेच तिने दाखवून दिले. असंख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे दहावीच्या परीक्षेच ९४ टक्के गुण पटकाविणाऱ्या श्रुतिका जगदीश कोपरकर हिची.

नागपुरातील हातमजुराच्या मुलीची ‘घे भरारी’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांच्या हातमजुरीवर कुटुंबाचे दोन वेळचे भरणारे पोट. ना अभ्यासाला आवश्यक पुस्तके, ना सरावासाठी योग्य साहित्य. फक्त मनात अभ्यास करण्याची ओढ होती अन् स्वत:ला सिद्ध करण्याचा केलेला संकल्प. याच बळावर तिने गरिबीच्या अडथळ्यांवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश अक्षरश: खेचून आणले. मनात जिद्द असली अन् अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली तर अशक्यप्राय वाटणारे व अडथळ्यांनी भरलेले शिखरदेखील सहजपणे सर करता येते हेच तिने दाखवून दिले. असंख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही कहाणी आहे दहावीच्या परीक्षेच ९४ टक्के गुण पटकाविणाऱ्या श्रुतिका जगदीश कोपरकर हिची.
शांतिनगर येथील विनायकराव देशमुख हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या श्रुतिकाने गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहतच यशाचा किनारा गाठला आहे. दैनंदिन गरजांचा खर्च पेलतानाच तिच्या पालकांच्या नाकीनऊ येतात. घर अतिशय लहान, अभ्यासाला जागा कमी अशा स्थितीतदेखील श्रुतिकाने हार मानली नाही. तिने दहावीता वर्षभर मन लावून अभ्यास केला. श्रुतिकाला डॉक्टर होण्याची इच्छा आहे.
शाळेने केले मौलिक सहकार्य
शाळेतील हुशार मुलगी अशी श्रुतिकाची अगोदरपासूनच ओळख होती. त्यामुळे शाळेनेदेखील तिच्याकडे विशेष लक्ष दिले. प्राचार्य प्रदीप बिबटे यांनी तर तिचा पूर्ण खर्च उचलण्याचीदेखील तयारी दाखविली. अगदी तिला पौष्टिक अन्न मिळावे यासाठीदेखील पुढाकार घेतला. शाळेतील शिक्षकांच्या पाठबळामुळे श्रुतिकाचादेखील आत्मविश्वास वाढला. संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव जोशी व सचिव अविनाश देशपांडे यांनीदेखील तिचा वेळोवेळी हुरुप वाढविला.
शिक्षकांचेदेखील डोळे पाणावले
निकाल जाहीर होताच शिक्षकांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घराकडे धाव घेतली. मात्र कळमना येथील तिच्या घरी पोहोचताच सर्वांना धक्काच बसला. शहरात झालेल्या वादळामुळे तिच्या घराचे छप्परच उडाले होते. श्रुतिकाने सर्वांना शेजारच्यांच्या घरी बसविले व तेथे तिचा कौतुकसोहळा झाला. परिस्थितीचे चटके खातदेखील भविष्यासाठी झटणाºया कोपरकर कुटुंबाची जिद्द पाहून शिक्षकांचेदेखील डोळे पाणावले.