कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 11:29 IST2021-02-19T11:28:37+5:302021-02-19T11:29:08+5:30
Nagpur News कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा; सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. या संदर्भातील स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याआनुषंगाने १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असेही त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
- लग्नसमारंभात ५०पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी आहे
- याबाबत नियमाचे पालन होत नसल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित हॉल, लॉनमालकास जबाबदार ठरवून हॉल किंवा लॉनचे लायसन्स रद्द करावे.
अंत्यसंस्काराकरिता २०पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी आहे.
- विविध सामाजिक, सांस्कृतिक राजकीय, क्रीडा व इतर सर्वच प्रकारच्या व्यक्तींनी एकत्रित जमाव.
प्रतिबंधित करण्यात आले आहे.
क्वारंटाइन रुग्ण बाहेर आढळल्यास कारवाई.
- ज्या कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वारंटाइन-आयसोलेशन करण्यात आले आहे, त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये व तसेच क्वारंटाइन विषयक नियमांचे पालन करावे. असे रुग्णबाहेर फिरताीना आढळून आल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदाअंतर्गत त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल.
कोविडची लक्षणे आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळवा
- ज्या खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन केले जाते तेथे रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास, त्या रुग्णांबाबतची माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नियंत्रण कक्ष येथे द्यावी. माहिती न दिल्यास संबंधित रुग्णालय कारवाईस पात्र ठरतील.
सुपर स्फ्रेडरची चाचणी करा
- नियमित संपर्कात येणारे व्यावसायिक (सुपर स्फ्रेडर ) वेंडर, दुकानदार, ऑटो चालक, दूध वितरक यांची रॅपिड ॲन्टिजेन तपासणी करावी.
- सार्वजनिक उपयोगाच्या जागा उदा, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, स्वच्छतागृहे यांच्या नियमित निर्जंतुकीकरणासाठी फवारणी कार्यक्रम मोठ्या स्तरावर राबविण्यात यावा.