विजय घोडमारे यांच्या आक्षेपांवर २४ तासांत कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST2021-01-16T04:10:41+5:302021-01-16T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आक्षेप ...

विजय घोडमारे यांच्या आक्षेपांवर २४ तासांत कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी आमदार विजय घोडमारे यांनी हिंगणा मतदारसंघात ५० हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आक्षेप घेतला आहे. या आक्षेपावर निवडणूक अधिकारी व तहसीलदार यांनी नियमांनुसार १५ जानेवारीपर्यंत कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत हिंगणा मतदारसंघात दुबार व समान नोंदी असलेल्या एकत्रीकृत मतदार यादीमध्ये ५० हजारांहून अधिक मतदारांची चुकीची नोंदणी असल्याचा आक्षेप घोडमारे यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ११ डिसेंबर २०२० रोजी आक्षेप घेतला. आ.समीर मेघे यांचे स्वीय सचिव अतुल नाईक व त्यांच्या कुटुंबीयांची नावे दोन मतदारसंघात असल्याचे त्यांनी नमूद केले होते. दक्षिण-पश्चिम नागपूर, मध्य नागपूर, दक्षिण नागपूरसह १६ मतदारसंघातील ३९ हजार ७९१ जणांची नावे हिंगण्यात नोंदविण्यात आली आहे. तसेच दुबार किंवा त्याहून जास्त नावे असलेल्या १२ हजार ८८९ मतदारांचा उल्लेखदेखील याचिकेत करण्यात आला. निवडणूक आयोगाला बोगस मतदारांची कल्पना असतानादेखील दुरुस्तीचे काम झाले नाही. शिवाय नव्याने प्रसिद्ध झालेल्या एकीकृत मतदारयादीवर आक्षेप घेतल्यावरदेखील पावले उचलण्यास टाळाटाळ होत असल्याची बाब याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायमूर्तीद्वय न्या.नितीन जामदार व न्या.अनिल किलोर यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले. याचिकाकर्त्याकडून अॅड.प्रदीप वाठोरे यांनी काम पाहिले.