थकीत टॅक्स न भरणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:23 IST2018-08-29T00:22:06+5:302018-08-29T00:23:00+5:30
मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मंगळवारी दिले.

थकीत टॅक्स न भरणाऱ्यांवर कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील अनेक वर्षापासून असलेली मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी भरली जात नाही. परिणामी महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शहरातील विकास कामांवर परिणाम होतो. याचा विचार करता थकीत टॅक्स न भरणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मंगळवारी दिले.
जाधव यांनी आशीनगर व मंगळवारी झोनचा मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कर अधीक्षक फा.गो उके, सहायक कर अधीक्षक गौतम पाटील तर मंगळवारी यांच्यासह झोनमधील सर्व वॉर्डाचे कर निरीक्षक व कर संकलक उपस्थित होते.
कर विभागात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असूनही योग्य टॅक्स वसुली न करणाऱ्या निष्क्रिय कर निरीक्षक व कर संकलक यांच्यावर कारवाई केली जाईल. दिवसेंदिवस थकबाकी वाढत आहे. त्यामुळेच देण्यात आलेले त्रैमासिक उद्दिष्ट निम्मेही गाठता आले नाही. टॅक्स वसुलीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यास महापालिका तत्पर आहे. त्यामुळे कर निरीक्षक व संकलकांनीही आपल्या कामाप्रति तत्परता दाखवावी, असे जाधव म्हणाले.
कर निरीक्षक व कर संकलक यांनी नागरिकांशी सुसंवाद साधावा. आपल्या कुशल नेतृत्वगुणाचा उपयोग करून घेत ३० सप्टेंबरपर्यंत त्रैमासिक उद्दिष्टपूर्ती होईल, यावर लक्ष केंद्रित करा, कर वसुली करताना जर त्रास होत असेल तर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, असा सल्ला सुनील अग्रवाल यांनी दिला.