केकसाठी तडीपारने केला चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:22+5:302021-05-20T04:08:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केक न दिल्यामुळे संतप्त होऊन तडीपार गुंडाने एका बेकरी संचालकावर चाकूने हल्ला करून त्याला ...

केकसाठी तडीपारने केला चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केक न दिल्यामुळे संतप्त होऊन तडीपार गुंडाने एका बेकरी संचालकावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १८) दुपारी नंदनवन येथील आदर्शनगरात घडली.
नाैशाद खान यांची आदर्शनगरात बेकरी आहे. बेेकरीच्या मागच्या भागात नौशाद राहतात. मंगळवारी दुपारी तडीपार गुंड रमजान ऊर्फ भोकन्या (३०) रा. बेसा पॉवर हाऊस हा त्याचा साथीदार कालू ऊर्फ कसाई कुरेशी आणि जब्बार याच्यासोबत नौशादच्या घरी आला. त्यांनी नौशादला केक मागितला. नौशादने बेकरी बंद असल्याचे सांगितले. तरीही आरोपी नौशादला केक मागू लागले. नकार दिल्याने ते शिवीगाळ करीत नौशादशी वाद घालू लागले. या दरम्यान रमजानने चाकूने हल्ला करून नौशादला जखमी केले. तडीपार गुंडाने हल्ला केल्याने नंदनवन पोलीसही हादरले. त्यांनी लगेच भोकन्याचा शोधून अटक केली.
मागील चार दिवसांत तडीपार गुंड शहरात फिरत असल्याचे हे दुसरे प्रकरण उघडकीस आले आहे. १५ मे रोजी महाल येथील गांधी गेटजवळ तडीपार गुंड शहबाज ऊर्फ सानू याची प्रतिस्पर्धी गुंड प्रवीण घाटे, त्याचा भाऊ सौरभ आणि साथीदार अरशद शेखने हत्या केली होती.